मुंबई : भाजपाचे सनातन धर्मावरील प्रेम उतूमातू लागले आहे. पण सनातन धर्म म्हणजे पारदर्शक विचारांचा प्रवाह. सनातन धर्म म्हणजे कलंकित लोकांची पापे धुणारी ‘वॉशिंग मशीन’ नव्हे. सनातन धर्म म्हणजे गंगामाई. सनातन धर्म ही राजकीय स्वार्थाची गटारगंगा नव्हे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी त्यांच्या धर्मसंकल्पनेची व्याख्या स्पष्ट केली आहे. ‘‘जे भ्रष्टाचारी नेते आहेत, ज्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती वाटते आहे अशा नेत्यांसाठी भाजपाची दारे उघडीच आहेत.’’ भाजपाच्या सनातन धर्माचा हा खरा चेहरा आहे, अशी कडाडून टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – मालामाल : तेलंगणा राज्यातील खासदार श्रीमंतीत अव्वल; महाराष्ट्र चौथ्या स्थानावर
सनातन धर्म म्हणजे फक्त पोथ्या, पुराणे, वेद नाहीत. मानवता व शुद्ध आचरण, मातृभूमीचे रक्षण अशा कर्तव्याचे पालन करणे हेसुद्धा धर्मकर्तव्य आहे. आज जो धर्म विकृत व हिडीस स्वरूपात भाजपाने समोर आणला त्यापासून देशाला आणि समाजाला धोका आहे. त्यामुळे जगात सनातन धर्माची नाचक्की होत आहे, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आला आहे.
गोमांस भक्षणासंदर्भात भाजपाचा गोंधळात गोंधळ
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांचा मात्र सनातन धर्माचा जप सुरू आहे. भाजपास सनातन धर्माची चिंता वाटणे हे ढोंग आहे. भाजपच्या सनातन धर्मात ‘बीफ’ म्हणजे गोमांस वर्ज्य आहे, पण भाजपचे अनेक मंत्री व नेते गोमांस खाण्याचा पुरस्कार करतात. गोवा तसेच ईशान्येकडील भाजपाशासित राज्यांत गोमांस विक्री सुरूच आहे. त्यामुळे गोमांस भक्षणासंदर्भात स्वतः भाजपा गोंधळात गोंधळ करीत असून इतरांना सनातन धर्माचे धडे देत आहे. हे धडे त्यांनी आधी त्यांच्या आघाडीतील ‘अण्णा द्रमुक’सारख्या पक्षांना द्यावेत, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.
प्रकाश आंबेडकरांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा
मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झाले आहे व हा सरळ सरळ धर्मद्रोह आहे. धर्माच्या नावावर भेदाभेद, नरसंहार, अस्पृश्यता म्हणजे ‘सनातन’ धर्म नव्हे. आता ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काही महत्त्वाची माहिती उघड केली आहे. आगामी 2024च्या निवडणुकीपूर्वी गुजरात दंगलीप्रमाणे देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार घडविण्याचा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे, असे आंबेडकरांनी सांगितले. आंबेडकर म्हणतात ते खोटे आहे काय? व ते खोटे असेल तर सरकारने ऍड. आंबेडकरांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवायला हवे, असे आव्हानही ठाकरे गटाने दिले आहे.