Homeदेश-विदेशSanjay Raut : आज काही मुहूर्त नाही तरी मोदींची गंगेत डुबकी, राऊतांचा...

Sanjay Raut : आज काही मुहूर्त नाही तरी मोदींची गंगेत डुबकी, राऊतांचा टोला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट देण्याकरिता पोहोचले आहेत. ते तिथे शाही स्नान करणार असून त्यांच्या या स्नानावर खासदार संजय राऊतांनी टीकास्त्र डागले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट देण्याकरिता पोहोचले आहेत. सकाळी 11 वाजता ते संगमावर पवित्र स्नान करून गंगा पूजा करणार आहेत. परंतु, त्यांच्या या भेटीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत भीती असल्याने आणि महत्त्वाची बाब म्हणजे आज कोणताही मुहूर्त नसताना सुद्धा त्यांनी कुंभमेळ्याला जाऊन गंगेत जाऊन डुबकी मारण्याचा विचार केल्याचे राऊतांनी म्हटले आहे. बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले आहे. (Sanjay Raut criticism of PM Narendra Modi Kumbhmela visit)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंभमेळ्याच्या भेटीबाबत म्हणाले की, त्यांना भीती आहे. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत विकासासंदर्भात, जो काही प्रचार केला, ज्या काही योजनांच्या घोषणा केला, जो प्रचार केला, तो लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी आजचा मुहूर्त काढला आहे. खरं तर आज पंचांगानुसार कोणताही महान मुहूर्त नाहीये. आजचा मुहूर्त फक्त दिल्ली विधानसभा निवडणुकांचा आहे. आणि नेमके आजच मोदी कुंभमेळ्यात जात आहे. आज दिवसभर टिव्हीला त्यांची गंगेतील डुबकी दाखवली जाईल. पण निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्यांनी सर्व प्रसार माध्यमांना नोटीस दिली पाहिजे आणि म्हटले पाहिजे की मोदींची गंगेतील डुबकी दाखवू नका, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Sanjay Raut : चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दोन हजार भाविक बेपत्ता, राऊतांनी दावा करत उपस्थित केले प्रश्न

मोदींना स्नान करू द्या, त्यांनी जर का आम्हाला खासदारांना नेले असते तर आम्ही सर्व खासदार सुद्धा गेलो असतो. ते एकटे एकटे का जात आहेत. आम्हाला जर त्यांनी सोबत नेले असते, तर आम्ही सुद्धा ते पुण्य पदरात पाडून घेतले असते. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने त्यांनी आजचा दिवस कुंभमेळ्याला जाण्यासाठी निवडला. त्यांना उद्या कुंभाला जाता आले असता, निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा जाता आले असते किंवा त्यांना सुरुवातीला पण जाता आले असते, पण त्यांनी मुहूर्त आजचाच 05 तारखेचा मुहूर्त काढला आहे, असे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या या टीकेला भाजपा नेत्यांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.