नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत महाराष्ट्र अनेक चर्चा सुरू आहेत. एकीकडे मुख्यमंत्रिपदावरून महायुतीचे नेते दिल्लीच्या वाऱ्या करत असून मंत्रिपदावरूनही राजकारण सुरू आहे. तर, दुसरीकडे विरोधकांनी महायुतीमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींवरून निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह महायुतीवर टीका केली. तसेच, मुख्यमंत्रिपदाबाबतही त्यांनी विधान केले. “महाराष्ट्र विधानसभेचे निकाल मान्य नसले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचे स्वागतच करू. निकालात गडबड घोटाळे आहेत, तरीही लोकशाहीत आकडा हा महत्त्वाचा असतो, मग तो कसाही असो,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. (Sanjay Raut on Chief ministership and Mahayuti conflicts)
महायुतीच्या बैठकीवर काय म्हणाले संजय राऊत?
गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते हे दिल्लीत गेले होते. यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत आणि मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याचे समोर आले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. पण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आपले काम काढून घेतले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी त्यांची मदत घेतली पण आता त्यांचे काम संपले आहे. भविष्यात चे पक्ष फोडून बहुमत मिळवल्यास आश्चर्य वाटणार नाही,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला. अजित पवार हे सदैव उपमुख्यमंत्री असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावे? महाराष्ट्रातील प्रशासन कसे असावे? पोलीस महासंचालक कोण असावे? मुंबई पोलीस आयुक्त कोण असावे? एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्याकडे कोणती खाती असावीत? हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दिल्लीतून ठरवतात. आमच्या महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्यासमोर मान झुकवून उभे असून जी हुजर करत आहेत.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरवला जात नसेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमानाच्या गोष्टी या सरकारने करु नये. सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष एकत्र आहेत. शिवसेनेला 50 हून अधिक, अजित पवारांना 40 हून अधिक तर भाजपला 130 जागा मिळाल्या. पण पदांचे वाटप कसे करावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.” असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. “एकनाथ शिंदे हे उद्या संरक्षण मंत्रिपदही मागू शकतात. एवढेच काय तर, ते उद्या म्हणतील मला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पद द्या. चर्चा सुरू असतील तर माणसे काहीही मागू शकतात. त्यांचे काहीही मनावर घ्यायची गरज नाही. अमित शहांनी डोळे वटारले की त्यांना गप्प बसावे लागते.” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.