नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या ठिकाणी मौनी अमावस्येनिमित्त करण्यात येणाऱ्या पवित्र स्नानाच्यावेळी संगम घाटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेला 10 दिवसांचा कालावधी होत आलेला असतानाही अनेक भाविक बेपत्ता आहेत. तर महाकुंभतील या घटनेत सापडलेले कुटुंबीय आजही आपल्या लोकांचा शोध घेत आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर या घटनेत दोन हजारांपेक्षा अधिक भाविक बेपत्ता असून 1500 पेक्षा अधिक भाविक मरण पावल्याची शक्यता असल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. (Sanjay Raut raised questions claiming that two thousand devotees are missing after Mahakumbh stampede incident)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, मंगळवारी (ता. 04 फेब्रुवारी) संसदेत मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशातील महाकुंभमेळ्यात जी दुर्घटना घडली. त्याबाबत मत मांडले. महाकुंभ हा आमच्या सर्वांसाठी श्रद्धेचा, आस्थेचा आणि धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्ना करू आले. पुढील आठवड्यात मी सुद्धा या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहे, असे राऊतांकडून सांगण्यात आले. पण शेवटी जी दुर्घटना घडली, त्याला कोणीतरी जबाबदार आहे, असेही यावेळी राऊतांनी स्पष्ट केले.
तसेच, ज्या पद्धतीने त्या दिवशी चेंगराचेंगरी झाली, त्याची कारणे काय आहेत? नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले? हा माझा राज्यसभेत प्रश्न होता. मी असे म्हणत नाही की ही घटना सरकारमुळे घडली आहे किंवा या घटनेला एखादी विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे, आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक हे त्यादिवसापासून बेपत्ता आहेत आणि चार दिवसापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून प्रेत काढण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे. तर नक्की मृतांचा आकडा किती आहे? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. लोकांमध्ये चर्चा आहे की, तिथे दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. तिथे साधारणतः 1500 ते 2000 लोक मरण पावल्याची शक्यता आहे. मी असे म्हणतो की, तिथे 30 हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज लोकांसमोर का आणण्यात येत नाही, ज्यामधून याबाबतचे सत्य कळेल. दोन हजार लोक हे त्यादिवसापासून बेपत्ता आहेत. याचा अर्थ ती लोक मरण पावली का? त्यानंतर त्यांची प्रेत सापडत नसल्याने ती गायब केली का? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले आहेत.
मी चेंगराचेंगरीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी बाकावरून याबाबत गोंधळ सुरू करण्यात आला. त्यामुळे उपसभापतींनी माझा माईक बंद केला. या देशात राष्ट्रपतींच्या भाषणावर आम्ही काही चर्चा करतो, तेव्हा देशातील घटनांचा संदर्भ द्यावा लागतो. मी जे सांगत आहे, ती नवीन माहिती नसून लोकसभेत खासदार अखिलेश यादव यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता. संसदेत आमच्या सहकाऱ्यांनीसुद्धा हाच मुद्दा मांडला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला. पण मी बोलायला उभा राहिलो, मी हा मुद्दा मांडल्यानंतर गोंधळ सुरू झाला. त्यामुळे मला राज्यसभेत बोलण्यापासून रोखण्यात आले, हे काही योग्य नाही.