दिल्ली : ज्यांचे आयुष्य डील करण्यात गेले. डील केल्यामुळे त्यांच्या पक्षाची वास्तुशांती झाली. ते स्वत:हा डीलर आहे. एकदा तुरूंगात सुद्धा जाऊन आले आहेत. त्यांनी माझ्याबद्दल डील हा शब्द वापरणे पटत नाही, असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. धसांचा बुरखा फाटलेला आहे. अजूनही धस मैदानात लढण्याचे नाटक करत असतील, ते करत राहावे, अशा शब्दांत राऊतांनी धसांना सुनावले आहे. राऊत हे दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
धसांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “सोडून द्या, हो सुरेश धसांकडे काय पाहताय. धसांवर कुणी विश्वास ठेवेल, असे मला वाटत नाही. धसांचा बुरखा फाटलेला आहे. अजूनही धस मैदानात लढण्याचे नाटक करत असतील, ते करत राहावे. ‘बूंद से गयी, वो हौद से नहीं आने वाली’ असे म्हणतात, ते त्यांच्याबाबत लागू आहे.”
धसांनी बैठकीतून बाहेर पडायला हवे होते…
“धसांनी मुंडेंची भेट घेतली. ज्याक्षणी मुंडे बैठकीसाठी आले, त्याक्षणी धसांनी तिथून बाहेर पडायला हवे होते. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वांना सांगायला पाहिजे होते की, मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी खंबीरपणे लढत आहे,” असे राऊतांनी म्हटले.
दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावे…
“भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत असताना देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका मंत्र्याला ( माणिकराव कोकाटे ) दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादा पवारांचे दोन मंत्री रडारवर आहेत. नैतिकतेच्या प्रश्नावर या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे अजितदादा पवारांनी नाही तर मुख्यमंत्र्यांनीच घ्यायला हवे,” अशी मागणी राऊतांनी केली आहे.
धसांचे राऊतांबद्दल काय विधान?
“ज्यांचे आयुष्य डील करण्यात गेले. डील केल्यामुळे त्यांच्या पक्षाची वास्तुशांती झाली. ते स्वत:हा डीलर आहे. एकदा तुरूंगात सुद्धा जाऊन आले आहेत. त्यांनी माझ्याबद्दल डील हा शब्द वापरणे पटत नाही. मी फाटका माणूस आहे, हे संजय राऊतांना माहिती नसेल. डील-बिल हा शब्द मला लागू होत नाही. राऊत हे आंतरराष्ट्रीय वक्ते आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ‘मातोश्री’वर राऊतांबद्दल कितपट विश्वाससार्हता राहिली, हे मला सांगता येत नाही,” असा टोला धसांनी लगावला होता.