Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश संसदेत मोदींचे 50 मिनिटांचे अखेरचे भाषण: नेहरु, इंदिरा गांधीची स्तुती, संसदेवरील हल्ल्याला...

संसदेत मोदींचे 50 मिनिटांचे अखेरचे भाषण: नेहरु, इंदिरा गांधीची स्तुती, संसदेवरील हल्ल्याला म्हटले आत्म्यावरील हल्ला

Subscribe

नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्यापासून कामकाज होत असलेल्या संसदेच्या इमारतीमधील संसदीय कामकाजाचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) संसदेचे कामकाज नवीन संसद इमारतीमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनामध्ये 50 मिनिटांचे अखेरचे भाषण केले. यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळाला उजाळा दिला.

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘हे ते सभागृह आहे जिथे पंतप्रधान पंडित नेहरुंच्या स्ट्रोक ऑफ मिडनाईटचा घोष आजही आम्हाला प्रेरणा देतो. इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामाचे आंदोलन देखील या सभागृहाने पाहिले आहे.’

- Advertisement -

ते म्हणाले, ‘या सभागृहाने कॅश फॉर व्होट आणि कलम 370 रद्द होतानाही पाहिले आहे. वन नेशन, वन टॅक्स, जीएसटी, वन रँक वन पेंशन, गरीबांना 10% आरक्षण देखील या सभागृहाने दिले आहे.’

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. या दरम्यान चार विशेष विधेयके सादर होणार आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्या सोनिया गांधी यांनी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून नऊ मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नरेंद्र मोदी म्हणाले, ‘हे सभागृह सोडणे हा अतिशय भावनिक क्षण आहे. एखादं कुटुंबही जेव्हा जुनं घर सोडून नवीन घरात जात असतं तेव्हा अनेक आठवणी दाटून येतात. आम्ही जेव्हा ही संसद सोडून जात आहोत तेव्हा आमच्या मन मस्तिष्कमध्येही भावनांचा, आठवणींचा काहूर आहे. यामध्ये उत्साहवर्धक क्षण आहेत, काही नोक-झोंक आहे तर काही हसरे तर काही, कडवट क्षण आहेत, जे आमच्यासोबत राहाणार आहेत.’

माजी पंतप्रधानांच्या कार्याला उजाळा
पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्रींपासून अटल बिहारी, मनमोहनसिंगांपर्यंत अनेक नावं आहेत ज्यांनी या सभागृहाचं नेतृत्व केलं. या ससंदेच्या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केले. देशाला नवा रुप-रंग देण्यासाठी परिश्रम केले, पुरुषार्थ गाजवला. आज त्या सर्वांची गौरवपूर्ण आठवण काढण्याचा दिवस आहे. सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया, चंद्रशेखर, आडवाणी यांसारखे असंख्य नावे आहेत ज्यांनी या सभागृहाला समृद्ध केले त्यांच्या चर्चेने हे सभागृह समृद्ध झाले आहे.

 

‘नेहरुजींच्या गुणगाण करताना, कोण आहे जो टाळी वाजणार नाही’
पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षावरही निशाणा साधला, ते म्हणाले, ‘या सभागृहात अशा अनेक गोष्टी घडल्या जेव्हा टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत झाले पाहिजे होते, मात्र त्यातही राजकारण केलं गेलं. नेहरुजींचे गुणगाण जर या सभागृहात केले गेले तर असा कोण सदस्य आहे जो त्यावर टाळ्या वाजवणार आही. शास्त्रीजींनी 65 च्या युद्धावेळी याच सभागृहातून देशाच्या सैनिकांना प्रोत्साहित केले होते. तर इंदिरा गांधींनी याच सभागृहातून बांगलादेश स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले होते. ‘

‘संसदेवरील हल्ला देश विसरु शकत नाही’
पंतप्रधानांनी 2001 च्या संसदेवरील हल्ल्याचाही उल्लेख केला. मोदी म्हणाले, ‘हा हल्ला इमारतीवर नाही तर आमच्या आत्म्यावर झाला होता. हा देश त्या घटनेला कधीही विसरु शकत नाही. दहशतवाद्यांशी लढताना ज्या सुरक्षरक्षकांनी जीवाची बाजी लावली त्यांनाही आपण कधीही विसरु शकत नाही. सदस्यांना वाचवण्यासाठी जा सैनिकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनाही आज मी नमन करतो’

‘स्वातंत्र्यपूर्वकाळात भगतसिंगांनी याच सभागृहात बॉम्ब फेकून आपला आवाज इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते. याच सभागृहात स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ आकाराला आले. याच सभागृहात दोन वर्षे 11 महिने संविधानावर चर्चा झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. स्वांतत्र्यानंतर या इमारतीला संसद म्हणून ओळख मिळाली. या इमारतीच्या निर्मितीचा निर्णय भलेही विदेशी शासकांचा असला तरी या इमारतीच्या निर्माणासाठी आपल्याच देशवासियांनी घाम गाळला होता. पैसा देखील आपल्याच देशवासियांचा होता.’

पंतप्रधानांच्या भाषणानंतर काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरींचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘पोखरणच्या काळात विदेशी शक्तींनी अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही थांबलो नाही. अटल बिहारी वाजपेयींनी जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. अणु परीक्षणानंतर देशावर अनेक बंधने घालण्यात आली होती, भाजप ज्यांच्यावर मौन राहाण्याचा आरोप करते, त्याच मनमोहनसिंगांच्या नेतृत्वातील सरकारने ते दूर करण्याचे काम केले.’

खर्गेंनी सांगितली 70 वर्षांची कमाई

राज्यसभेमध्ये काँगस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आम्हाला नेहमी एकच प्रश्न विचारला जातो, गेल्या 70 वर्षांमध्ये काय झाले? तर, आम्ही 70 वर्षांत केलेल्या कामाला पुढे घेऊन जाण्याचेच काम फक्त तुम्ही करत आहात, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘1950 मध्ये जेव्हा आम्ही लोकशाहीचा स्वीकार केला तेव्हा अनेक परदेशातील विद्वानांनी म्हटले होते की भारतासारख्या देशात लोकशाही अपयशी ठरेल, कारण येथे अशिक्षीत लोक आहेत. आम्ही त्या सर्व विद्वानांना खोटं ठरवलं. ही आमची 70 वर्षांतील कमाई आहे.’

- Advertisment -