सत्येंद्र जैन तुरुंगात चक्कर येऊन पडले; सर्वोच्च न्यायालयाने दिला सशर्त जामीन

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला. खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी न्यायालयाने जैन यांना ११ जुलैपर्यंत जामीन मंजूर केला आहे. जैन हे तिहार कारागृहातील शौचालयात चक्कर येऊन पडले होते. त्यांना मणक्याचाही त्रास सुरु झाला आहे.

सुट्टीकालीन न्या. जे. के. महेश्वरी व न्या. पी. एस. नरसिम्हा यांनी जैन यांना हा अंतरिम जामीन मंजूर केला. जैन यांनी साक्षीदारांना प्रलोभन दाखवू नये. न्यायालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली बाहेर जाऊ नये, असेही न्यायालयाने जैन यांना सांगितले आहे. यावरील पुढील सुनावणी १० जुलैला होणार आहे.

जैन यांनी दैनंदिन जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाने (ED) १८ मे २०२३ रोजी दिले होते. आज झालेल्या सुनावणीत जैन यांनी उपचारासाठी जामीन मागितला. दैनंदिन जामीनावर नंतर सुनावणी होईल, पण आधी उपचारासाठी तरी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती जैन यांच्यावतीने वरीष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.

जैन यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मध्ये तपासणी करावी. कारण लोक नायक रुग्णालयावर आमचा संशय आहे. जैन यांनी दिलेले वैद्यकीय कारणही बनाव आहे. जैन हे आरोग्यमंत्री होते. परिणामी दिल्ली रुग्णालयावर आमचा विश्वास नाही. जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे, असे AIIMS ने सांगितले तरच आम्ही त्यांच्या जामीनाला विरोध करणार नाही, असे ED च्या वतीने Additional Solicitor General एस. व्ही. राजू यांनी न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने जैन यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला.

गेल्या वर्षी सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकने (ED) अटक केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. गेल्याच आठवड्यात जैन यांना दिल्लीत सफदरगंज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात जैन यांची प्रकृती खूपच खालावल्याचे दिसत होते. यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला होता. आम्ही सरदार भगतसिंह याचे शिष्य आहोत. अन्याय आणि हुकुमशाहविरोधात आमचा लढा सुरुच राहिल, असा हल्लाबोल केजरीवाल यांनी भाजपवर केला होता.