मोहरम मिरवणुकींना परवानगी नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

muharram procession

सर्वोच्च न्यायालयाने मोहरम मिरवणुकींना परवानगी नाकारली आहे. देशात मोहरम मिरवणुकींना परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला सर्वोच्च न्यायालयाने नकार देत उत्तर प्रदेशच्या सय्यद काळबे जावद यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात येईल असे निर्णय घेतले जाणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. शिवाय, याचिकाकर्त्यास अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. “जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केले जाईल. आम्हाला ते नको आहे,” असे न्यायालयाने म्हटले आहे.

“एक न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भवणाऱ्या धोक्याचा विचार केला असे न्यायालयाने सांगितले. त्यावर “शिया समुदायातील बहुसंख्य लोक लखनौमध्ये वास्तव्याला आहेत, त्यामुळे केवळ लखनौसाठी परवानगी मिळेल का,” अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अलहाबाद न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.