मागासवर्गीयांच्या मतांसाठी भाजपचा नवा प्लान, टार्गेट ८४ काय आहे? जाणून घ्या

आकडेवारीनुसार, मागासवर्गीय लोकसंख्येचा एक मोठा वर्ग आहे, जिथे भाजप आपली पकड मजबूत करू शकला नाही.

Lok-Sabha-Elections-2024-BJP

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भारतीय जनता पक्षाने देशातील मागासवर्गीयांची मनं जिंकण्यासाठी एक नवा प्लान आखलाय. अनुसूचित जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप आता ‘घर घर चलो’ मोहीम राबवणार असल्याचं कळतंय. एका मीडिया रिपोर्टनुसार, देशातील १८ टक्के मागासवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी भाजप २१ दिवसांची देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. पक्षाच्या एससी मोर्चाने १४ एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीपासून ‘घर घर चलो’ मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या एससी मोर्चाचे प्रमुख लाल सिंग आर्य म्हणतात की, या मोहिमेअंतर्गत केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोहोचतील याची खात्री केली जाईल. यासोबतच मोर्चाची टीम योजनांसाठी अर्ज करण्यासंदर्भात लोकांना मदत करणार आहे. या अभियानांतर्गत भाजप मागासवर्गीय कुटुंबांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्याची तयारी करत आहे. यादरम्यान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांना तात्काळ मदत केली जाईल.

अभियानाच्या समारोपावेळी दिल्लीतील ताल कटोरा स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ८४ जागा SC साठी राखीव आहेत. यावेळी भाजप ६०-७० जागा जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. SC साठी राखीव असलेल्या ८४ जागांपैकी भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यापैकी ४६ जागा जिंकल्या.

दलितांसाठी भाजपची वाट अवघड का?
आकडेवारीनुसार, मागासवर्गीय लोकसंख्येचा एक मोठा वर्ग आहे, जिथे भाजप आपली पकड मजबूत करू शकला नाही. अहवालानुसार, पंजाबमध्ये अनुसूचित जातीचे मतदार ३४ टक्के आहेत. हिमाचल प्रदेशात हे प्रमाण २५ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये २४ टक्के आहे. याशिवाय राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय लोकसंख्या आहे.