SCO Summit : भारतात येण्यापूर्वी बिलावल भुत्तोंकडून व्हिडीओ संदेश ट्वीट

bilawal bhutto

पणजी : भारतात दोन दिवसीय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या (CFM) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो  (Bilawal Bhutto) झरदारी आज  दुपारी गोव्यात पोहोचले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S jaishankar) SCO सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

बिलावल भुत्तो झरदारी हे 2011 नंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत (CFM) पाकिस्तानी शिष्टमंडळाचे ते नेतृत्व करणार आहेत. याआधी २०११ मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार भारतात आल्या होत्या.

बिलावल भुत्तो यांनी भारतात येण्यापूर्वी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी केला होता. यामध्ये त्यांनी म्हटले की, मी गोवा, भारतात जात आहे. मी SCO चार्टरसाठी पाकिस्तानची दृढ वचनबद्धता दर्शवण्यासाठी या बैठकीत सहभागी होण्यासाठी जात आहे. मी परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेमध्ये पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करीन. SCO वर विशेष लक्ष केंद्रित करून, माझ्या भेटीदरम्यान मित्र देशांतील समकक्षांशी सकारात्मक संवादासाठी मी उस्तुक आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. SCO च्या सर्व सदस्य देशांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या निमंत्रणानंतर रशिया आणि चीनचे परराष्ट्र मंत्रीही भारतात आले आहेत, तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल हेही गोव्यात पोहोचले आहेत.

SCO ची स्थापना 2001 साली
SCO ची स्थापना 2001 मध्ये झाली. चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा SCO मध्ये समावेश आहे. सध्या भारताकडे SCO चे अध्यक्षपद असल्यामुळे या वर्षीच्या बैठका भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. यामध्ये SCO सदस्य देशांच्या मुख्य न्यायमूर्ती आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये चीन-आधारित SCO चे स्थायी सदस्य बनले. या बैठकीत दहशतवादाच्या आव्हानांव्यतिरिक्त युक्रेन युद्धाच्या परिणामांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.