विमानतळावर होत असलेल्या तपासणीत कटकटीची बाब असते ती लॅपटॉप बॅगेतून काढून दाखवण्याची. लॅपटॉप, औषधे आणि इतर द्राव्य पदार्थ बॅगेतून बाहेर काढून पोलिसांना दाखवावे लागतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या गोष्टी केल्या जात असल्या तरी प्रवाशांसाठी मात्र ते त्रासदायक असते. आता मात्र लवकरच प्रवाशांना या साऱ्या गोष्टींपासून सुटका होणार आहे. कारण लवकरच थ्रीडी स्क्रीनिंग मशीन प्रवाशांच्या बॅगा तपासणार आहे. हे मशीन प्रवाशांच्या बॅगेतील वस्तूंचे थ्रीडी छायाचित्र स्क्रीनवर दाखवणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बॅगेतून सामान काढण्याची गरज भासणार नाही. जगातील काही मोजक्या आणि नामांकित विमानतळांवर या मशिनची चाचणी सुरु आहे.
भारतातही चाचणीचे नियोजन
भारतीय विमानतळाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणारी सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्यूरिटी फोर्स (सीआयएसएफ) या चाचण्यांवर नजर रोखून उभे आहे आणि या तंत्राचा वापर आपल्या देशातही लवकरात लवकर सुरु करण्याची योजना सीआयएसएफ प्रयत्न करत आहे. सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही या तंत्राचा आणि त्याच्या चाचणीचा अभ्यास करत आहोत. भारतीय विमानतळावर या तंत्राची चाचणी करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही चाचणी जर यशस्वी ठरली तर स्क्रीनिंग दरम्यान प्रवाशांना बॅगेतून लॅपटॉप, औषधे आणि इतर द्रव्य पदार्थ बाहेर काढण्याची आवश्यकता पडणार नाही’.
विविध देशांमध्ये चाचणी यशस्वीरित्या पार
या थ्रीडी मशिनची चाचणी न्यूयॉर्क, कॅनडा आणि अॅमस्टरडॅम या देशांच्या विमानतळांवर चाचण्या झाल्या आहेत. सध्या लंडनच्या हिथ्रो विमानतळावर या मशिनची चाचणी सुरु आहे. या तंत्रामुळे एअर ट्राफिक सारख्या समस्येवर तोडगा काढण्यास मदत होणार आहे. गेल्यावर्षी सीआयएसएफने विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचा मुद्दा उचलला होता. सीआयएसएफने अहवालात सांगितले होते की, मागील पाच वर्षांमध्ये विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. या गर्दीमुळे सीआयएसएफवर दबाव वाढत आहे.