सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींच्या सचिवालयातून आंदोलकांना हुसकावलं, ५० जण जखमी; ९ जणांना अटक

रनिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती आहे. बुधवारी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रनिल विक्रमसिंघे विजयी झाले आहेत. माजी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. रनिल विक्रमसिंघे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाही विरोधकांचा विरोध आहे. आंदोलकांनी अनेक सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे. आंदोलक रनिल यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या लष्कराने आंदोलकांवर कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रपतींचे सचिवालय आंदोलकांच्या ताब्यातून रिकामे केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांनी राष्ट्रपती सचिवालयाचा ताबा घेतला होता. सचिवालय रिकामे करताना आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकही झाली. आंदोलकांना सचिवालयातून बाहेर काढले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, लष्कर आणि पोलिसांनी सचिवालय साफ करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सचिवालयावर कब्जा करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

अनेक आंदोलक जखमी

सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ५० आंदोलक जखमी झाले आहेत. याशिवाय ९ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेने व्यक्त केली चिंता

कोलंबोतील अमेरिकेच्या राजदूत ज्युली चुन यांनी मध्यरात्री गॅले फेस येथे आंदोलकांवर श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे. चुन यांनी अधिकाऱ्यांना संयम पाळावा आणि जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आवाहन केले.


हेही वाचा : राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज