घरताज्या घडामोडीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन

Subscribe

दीर्घ आजाराने वयाच्या ९३ व्या त्यांनी अखेरचा घेतला श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी निधन झाले. दीर्घ आजाराने वयाच्या ९३ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. मोतीलाल व्होरा यांनी रविवारी त्याचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र आज त्यांची प्राण ज्योत मालवली. मोतीलाल व्होरा हे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

- Advertisement -

मोतीलाल व्होरा मध्य प्रदेशमधील एका हिंदी वृत्तपत्राचे पत्रकार होते. त्यानंतर ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तसेच त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. काँग्रेसमध्ये नरसिम्हा राव, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते खास होते.

व्होरा यांचा जन्म २० डिसेंबर, १९२७ ला राजस्थानमधील नागौर येथील पुष्करणा ब्राह्मण कुटुंबात झाला होता. रायपूर आणि कोलकातामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम केले. शांतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना चार मुलं व दोन मुली आहेत. त्यांचा मुलगा अरुण व्होरा छत्तीसगडमधील दुर्ग विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे.

- Advertisement -

१७ वर्ष खजिनदारपदावर कार्यरत

काँग्रेस पक्षाच्या खजिनदारपदावर ते तब्बल १७ वर्ष कार्यरत होते. वाढतं वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी खजिनदार पदातून मुक्त करण्याची विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०१८ साली केली होती. व्होरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या खजिनदारपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांचंही २५ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जात होते. पक्षाचे राजकीय रणनितीकार म्हणूनही अहमद पटेल यांची ओळख होती. मोतीलाल व्होरा आणि अहमद पटेल या दिग्गज नेत्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठं नुकसान झालं आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोतीलाल व्होरा यांना व्हायली श्रद्धांजली

अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले !

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी वाहून घेतले होते. शेवटपर्यंत ते काँग्रेस विचारासाठी जगले. त्यांच्या निधनाने पक्षाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभवना व्यक्त केल्या आहेत.

मोतीलाल व्होरा यांनी आपली कारकिर्द पत्रकार म्हणून सुरु केली होती. १९६८ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७० मध्ये त्यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवून विजय संपादन केला तर १९७७ आणि १९८० मध्ये पुन्हा विजय संपादन केला. त्यांनी दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीयमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपालपद भूषवले. १८ वर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळली. ते राज्यसभेचे सदस्यही होते. पक्ष संघटनेतील विविध पदांची जबाबदारीही त्यांनी य़शस्वीपणे पार पाडली. कालच त्यांनी ९३ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. व्होरा यांना श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्होरा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -