घरक्राइमसणांना घडवायचे होते बॉम्बस्फोट, दाऊदचा भाऊ अनिसचे होते आदेश

सणांना घडवायचे होते बॉम्बस्फोट, दाऊदचा भाऊ अनिसचे होते आदेश

Subscribe

पकडलेल्या दहशतवाद्यांनी सांगितला प्लान

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबई, धारावीतील जान मोहम्मद शेखसह अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांना सणासुदीला देशभरात बॉम्बस्फोट घडवायचे होते. तसे आदेश कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमने दिले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. तसेच बंगाली भाषा बोलणारे १६ आणि पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले काही तरुण पश्चिम बंगालमध्ये लपले आहेत. तसेच आपण या दहशतवादी कृत्यामध्ये पैशांसाठी नाही तर जिहादसाठी सहभागी झालो आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगला गेल्याची माहितीही दोन दहशतवादी झिशान आणि ओसामा यांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि उत्तर प्रदेश दहशतवादीविरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी सहा जणांना मंगळवारी अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना मध्यरात्रीनंतर दिल्लीमधील एका न्यायाधीशांच्या घरीच त्यांच्यासमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी खुलासा केला आहे की गर्दीच्या ठिकाणी हल्ले करण्याचा त्यांचा इरादा होता. अनेक ठिकाणी आपण रेकीसुद्धा केली होती, असेही या दहशतवाद्यांनी म्हटले आहे. यामध्ये मुंबईमधील गर्दीची ठिकाणे, ट्रेन आणि मोठ्या मंदिरांबरोबरच उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानांचाही समावेश आहे. या मोठ्या मैदानांमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये घातपात घडवून आणण्याचा यांचा काही इरादा होता का या दृष्टीनेही तपास यंत्रणा तपास करत आहेत.

विशेष तुकडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी झिशान आणि ओसामा यांनी आपल्याला पैशाचा मोह नव्हता असे गुन्ह्याची कबुली देताना सांगितले आहे. केवळ जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला जाऊन दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेतल्याचा धक्कादायक खुलासा या दोघांनी केलाय. या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये आपली राहण्याची सोय एका फार्म हाऊसवर करण्यात आली होती. या ठिकाणी लष्कराचा खोटा पोषाख घालून अनेकजण वावरत होते. मात्र, साध्या कपड्यांमध्ये आलेली एक व्यक्ती लष्करी अधिकारी निघाली, असेही या दोघांनी सांगितले. साध्या कपड्यांमधील व्यक्तीलाच इतर सर्वजण सलाम करत असल्याचेही या दोघांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कराचा गणवेश घालून असणारे अधिकारी हे आयएसआयमधील फार खालच्या स्तरावरील लोक होते. त्यामुळेच त्यांना गणवेशात असूनही कोणी सलाम करत नव्हते, असे या दोघांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच आपल्याला एके ४७ बंदूक उघडणे आणि चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चिनी पिस्तुलाचेही प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आयईडी कसे आणि कुठे लावता येईल याचे प्रशिक्षणही या दहशतवाद्यांना देण्यात आलेले. रेकी करताना कोणी आपल्याला पकडले तर त्याला कशा पद्धतीने छोट्या हत्याराने जखमी करून तिथून पळ काढता येईल हे सुद्धा या तरुणांना शिकवण्यात आले आहे. कोणी रंगेहाथ पकडल्यास आणि वेळ पडल्यास कोणतेही हत्यार न वापरता एखाद्याचा जीव कसा घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी कोणी पाठलाग करत असेल तर कशाप्रकारे एखाद्या हॉटेल किंवा इतर ठिकाणी घुसून त्याच्यापासून वाचता येईल, अशा गोष्टींचेही प्रशिक्षण या दहशतवाद्यांना देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -