घरआतल्या बातम्यापवारांच्या प्रकृतीबाबत गांधी कुटूंबाकडून अबोला, पीएम, सीएमनेही केली पवारांची विचारपूस

पवारांच्या प्रकृतीबाबत गांधी कुटूंबाकडून अबोला, पीएम, सीएमनेही केली पवारांची विचारपूस

Subscribe

शरद पवार यांनी आपल्या प्रकृतीबाबतची माहिती सार्वजनिक करताच राज्यातून तसेच देशपातळीवर राजकीय मंडळींकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणारे ट्विट समोर आले. शरद पवार यांनीही आपल्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्यांचे आवर्जून धन्यवाद दिले. पवारांना शुभेच्छा देतानाही भाजपमधील महाराष्ट्रापासून ते केंद्रापर्यंतच्या नेत्यांमधून शुभेच्छा देण्यासाठी एकच स्पर्धा लागल्याचे चित्र होते. शिवसेना, कॉंग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची मोट बांधणाऱ्या शरद पवारांच्या प्रक्रृतीबाबत कॉंग्रेसकडून मात्र हातच राखूनच काही निवडक कॉंग्रेस नेत्यांकडून विचारपूस झाली. महाराष्ट्रातील काही कॉंग्रेस नेत्यांचा अपवाद सोडला, तर कॉंग्रेस केंद्रीय नेतृत्वाकडून कोणती प्रतिक्रिया आली नाही, ना गांधी घराण्यातून कोणीही पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. अहमदाबादमध्ये झालेल्या पवार शहा भेटीमुळे कॉंग्रेस नाराज असल्याचे वृत्ताचे प्रतिसाद हे पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या निमित्तानेही उमटले.

- Advertisement -

महाविकास आघाडीची मोट बांधताना शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडचे मन वळवण्यात यश मिळवले होते. दिवंगत कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांच्यापासून ते कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारची घडी बसवण्यात शरद पवारांनी मोलाची भूमिका बजावली. पण पवारांच्या आजारपणात मात्र एका ट्विटनेही कॉंग्रेसच्या हायकमांडनेही विचारपूस केली नाही ना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी विचारपूस केली. ट्विटरवर भारतातल्या नेत्यांमध्ये राहुल गांधी हे सर्वाधिक सक्रीय असणाऱ्या नेत्यांपैकी एक राजकीय नेते आहेत. पण त्यांच्याकडूनही पवारांच्या आरोग्याबाबत एक साध ट्विट करण्याची कोणतीही तसदी घेण्यात आली नाही. कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांमधूनही पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीचे एकही ट्विट समोर आले नाही. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही एकही ट्विट दिसले नाही. तर माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याकडूनही साधं एक ट्विटदेखील करण्यात आले नाही.

मूळचे कॉंग्रेसचे असणाऱ्या शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा मांडत याआधी कॉंग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेससोबत तीन टर्म असे आघाडी सरकार चालवण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. तसेच महाविकास आघाडी स्थापनेच्या वेळीही कॉंग्रेसचे मन वळवण्यात शरद पवारांचा वाटा महत्वाचा होता. पण २४ तास उलटूनही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या इतक्या मोठ्या नेत्याबाबत कॉंग्रेस केंद्रीय नेतृत्वाकडून साधी विचारपूसही केली गेली नाही. शरद पवार यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या सुशील कुमार शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांचा अपवाद वगळला तर कोणत्याही बड्या कॉंग्रेस नेत्याने २४ तास उलटल्यानंतरही पवारांच्या प्रकृतीबाबत चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक ट्विट करत पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

- Advertisement -

याआधी कॉंग्रेसचे नेते असणाऱ्या संदीप दीक्षित यांनी प्रश्न विचारला होता की गृहमंत्री कोणत्याही बड्या नेत्याला भेटतात तेव्हा या बड्या नेत्यांमध्ये काय घडले ? काय बोलणे झाले ? हे देशामधील जनतेला जाणून घेण्याचा पूर्णपणे हक्क आहे. एकुणच पवारांच्या अहमदाबाद येथील शहांसोबतच्या भेटीमुळे कॉंग्रेसमध्ये आता उघड नाराजी दिसू लागली आहे. या नाराजीचे पडसाद हे पवारांच्या आजारपणाच्या निमित्तानेही तितकेच उघडपणे दिसून आले आहेत. एकंदरीतच पवारांच्या शहांसोबतच्या भेटीचे पडसाद हे महाराष्ट्राच्या राजकारणातही आता दिसून आले आहेत. त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीतीली एकीच्या प्रकृतीवरही या सगळ्याचा परिणाम दिसून आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नेहमीच चांगले ट्यूनिंग असणाऱ्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांच्याकडून कोणतेही ट्विट दिसले नसले तरीही त्यांचा फोन हा शरद पवारांना गेल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांमध्ये परिवहन नंत्री असलेले अनिल परब तसेच मिलिंद नार्वेकर यांच्याकडून तब्येतीची विचारपूस करणारे ट्विट करण्यात आले आहे.

भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, आशिष शेलार याासारख्या अनेक भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर केंद्रातूनही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अनुराग ठाकुर यासारख्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करणारे ट्विट केले आहेत.


Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -