नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाची तयारी आणि त्यासंदभार्तील माहिती देण्यासाठी त्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. एकीकडे राज्यात तसेच केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून राजकारण तापले असतानाच त्यांनी अ. भा. साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असल्याचे जाहीर केले. (Sharad Pawar NCP SP on Akhil bhartiy marathi sahitya sammelan at delhi arrangement)
हेही वाचा : Maharashtra Winter Session 2024 : अजित पवारांची विरोधकांच्या बाजूने भूमिका, अध्यक्षांची केली कानउघडणी?
स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या डॉ. तारा भवाळकर आहेत. त्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी म्हणून संमेलनाची ही जागा ओळखली जाणार आहे. तसेच, या संमेलनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत.” अशी माहिती दिली.
त्याचप्रमाणे, “98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आली आहे. तसेच, मुख्य प्रवेशद्वारांपैकी एका प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळक यांचे नाव तर, दुसऱ्या प्रवेशद्वाराला दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे.” अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तसेच, संयोजकपद हे सरहद या संस्थेने स्वीकारले आहे. या संमेलनाला दिल्ली आणि महाराष्ट्रातील अंदाजे 5 हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहतील. तसेच, महाराष्ट्रातील 2500 प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित राहतील. तर, याठिकाणी 1500 लोकांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 21 फेब्रुवारीला संमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, असेदेखील शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.