घरदेश-विदेशमोदी, राहुल गांधी नाही, तर हे '३ नेते' पंतप्रधान पदासाठी दावेदार -...

मोदी, राहुल गांधी नाही, तर हे ‘३ नेते’ पंतप्रधान पदासाठी दावेदार – शरद पवार

Subscribe

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी लागणारे बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे भाकीत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी वर्तविले होते. आता त्याच धर्तीवर पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान पदासाठी दावेदार असलेल्या लोकांची नावे सांगितली आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यापैकी एक पंतप्रधानपदासाठी दावेदार होऊ शकतो. राहुल गांधी यांनी स्वतःच ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे अनेकदा सांगितले आहे, त्यामुळे त्यांचे नाव पर्याय म्हणून घेतले नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार मुलाखतीत असे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माझ्या अंदाजानुसार यावेळी एनडीएला अपेक्षित बहुमत मिळवता येणार नाही. त्यामुळे राज्यांची मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेल्या ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांच्यातून पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पर्याय येऊ शकतो.

- Advertisement -

पवार पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या अपयशी कामगिरीमुळे एनडीएच्या जवळपास १०० जागा कमी होतील. त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला पंतप्रधान पदाच्या पर्यायाबाबत विचार करावा लागेल. तसेच पवार स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. “राष्ट्रवादी राज्यात २२ जागा लढवत आहे. जर आम्ही २२ पैकी २२ जरी जिंकलो तरी सरकार स्थापन करण्याच्या जवळपासही आम्ही पोहचू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाचा विचार करणे संयुक्तिक नाही.”, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -