Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशSharad Pawar : 1991मध्ये पंतप्रधानपदासाठी नाव शॉर्टलिस्ट झाले, पण...; शरद पवारांनी केला खुलासा

Sharad Pawar : 1991मध्ये पंतप्रधानपदासाठी नाव शॉर्टलिस्ट झाले, पण…; शरद पवारांनी केला खुलासा

Subscribe

इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर निवडणुकीला विरोधकांमधले अनेक लोक उभे राहिला तयार नव्हते. एक वेगळे वातावरण होते. तरीही, विरोधी पक्षाचेही काम केले पाहिजे आणि म्हणून आम्ही काही लोकांनी निवडणूक लढवायचे ठरवले.

(Sharad Pawar) मुंबई : तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुर येथे 21 मे 1991 रोजी एका निवडणूक रॅलीदरम्यान महिला आत्मघाती बॉम्बरने स्फोट घडवला होता. यामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. अर्थातच, त्या निवडणुकीवर या घटनेचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्यावेळची एक आठवण सांगितली. त्यावेळी पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव शॉर्टलिस्ट झाले होते. पण नरसिंह राव यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. (Sharad Pawar did not get the post of Prime Minister)

राजधानी दिल्लीत काल, गुरुवारी निलेशकुमार कुलकर्णी यांच्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमात त्यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 1991मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. तेव्हा सर्व चित्र बदलले. सगळ्यांनी बसवून ठरवले की, काही ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीला उभे राहायचे. त्यात मीही होतो. पण माझी काहीच तयारी नव्हती. ती बैठक दिल्लीतच झाली होती. त्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाला, पक्षाचे नेतृत्व करायला दोन-तीन लोकांची नावे शॉर्टलिस्ट झाली होती. त्याच्यात माझे नावही होते. पण शेवटी निर्णय नरसिंह राव यांच्या बाजूने लागला. मला 158 मते मिळाली आणि नरसिंह राव यांना बहुदा 190 आणि काही अधिक मते मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले. नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात माझा समावेश करून संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हेही वाचा – Thackeray vs Yogi Adityanath : आदित्यनाथांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला खोटे पाडले, ठाकरेंची टीका

मी स्वतः अनेक वर्ष संसदेत आहे. 1984 साली मी पहिल्यांदा लोकसभेत आलो. तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हतो तर, विरोधी पक्षात होतो. इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर निवडणुकीला विरोधकांमधले अनेक लोक उभे राहिला तयार नव्हते. एक वेगळे वातावरण होते. तरीही, विरोधी पक्षाचेही काम केले पाहिजे आणि म्हणून आम्ही काही लोकांनी निवडणूक लढवायचे ठरवले. मी निवडणुकीला उभा राहिलो आणि निवडून आलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधी ते आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्याशी आम्हा लोकांचा सुसंवाद होता. राजकारणामध्ये अनेक प्रश्नांवर मतभेद असतात, मतभिन्नता असते; पण व्यक्तिगत सलोखा हा शक्यतो राखायचा असतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या समोर महाराष्ट्राचे त्या काळाचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? वडेट्टीवारांचा सवाल