दिल्ली : माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांचे 13 महिन्यांचे सरकार केवळ एका मताने पडले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी देशाचे 10 वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळत होते. एका खासदाराच्या मताने 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते. हे एक मत शरद पवार यांनी मिळवले होते. पण, हे मत कसे मिळवले, याचा उलघडा शरद पवार यांनी केला नाही.
दिल्लीत निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी वाजपेयींचे सरकार कसे पडले, याचा किस्सा सांगितला आहे.
शरद पवार म्हणाले, “माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट फार लोकांना माहिती नाही की मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो. माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात एक घटना घडली. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचे सरकार असताना आम्ही विरोधी पक्षात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एक मताने मंजूर झाला.”
“आता ते जे एक मत होतं ते मी मिळवलं होतं. कसं मिळवलं ते मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते, त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो आणि सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडलं आणि त्या वेळेला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही माझ्याकडे होती, हा इतिहास आहे,” असं शरद पवार यांनी सांगितले.
“मी स्वतः अनेक वर्ष संसदेत आहे. 1984 साली मी पहिल्यांदा लोकसभेत आलो. तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हतो तर विरोधी पक्षात होतो. इंदिरा गांधींची हत्या झाली; त्यानंतर निवडणुकीला विरोधकांमधले अनेक लोक उभे राहिला तयार नव्हते. एक वेगळं वातावरण होतं. तरीही विरोधी पक्षाचंही काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही काही लोकांनी निवडणूक लढवायचं ठरवलं. मी निवडणुकीला उभा राहिलो आणि निवडून आलो. राजीव गांधी प्रधानमंत्री झाले. प्रधानमंत्री राजीव गांधी ते आजपर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले; त्यांच्याशी आम्हा लोकांचा सुसंवाद होता. राजकारणामध्ये अनेक प्रश्नांवर मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण व्यक्तिगत सलोखा हा शक्यतो राखायचा असतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या समोर महाराष्ट्राचे त्या काळाचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला,”