घरदेश-विदेशकाँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शशी थरुर? सोनिया गांधींची घेतली भेट

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शशी थरुर? सोनिया गांधींची घेतली भेट

Subscribe

नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती करणारा ठराव महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेसने केलेला असतानाच, दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते हे अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यासाठी मंजुरी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी येत्या 17 ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शशी थरूर यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. पक्षांतर्गत लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आपण ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर सोनिया गांधी यांनी मंजुरी देत ही निवडणूक कोणीही लढवू शकतो, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी प्रकाशित करावी, अशी मागणी शशी थरूर आणि आसामचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून केली होती. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेत 10 सूचकांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस समितीचे प्रतिनिधीच सूचक असतील. त्यामुळे त्यांची नावे समजणे आवश्यक आहे. त्यांचे नाव अंतिम यादीत न आल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो, असे थरूर यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे, पक्षसंघटनेत व्यापक बदल करण्याची आग्रही मागणी करणाऱ्या काँग्रेसमधील जी-23 गटातील शशी थरूर हे नेते आहेत.

- Advertisement -

सोनिया गांधी आणि शशी थरूर यांच्यात झालेल्या या बैठकीच्या वेळी अन्य काही नेते उपस्थित होते, असे समजते. तथापि, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे देखील निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तथापि, स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता हे पद स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांचे मन वळविण्याचे ते प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही – जयराम रमेश
ज्याला ही निवडणूक लढवायची असेल, तो लढवू शकतो. त्या सर्वांचेच स्वागत आहे. पक्षांतर्गत लोकशाही मजबूत करण्यावरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा भर राहिला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ही खुली, लोकशाहीनिष्ठ आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. ही निवडणूक लढण्यासाठी कोणालाही कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -