खर्गेंना अधिकृत उमेदवार म्हणून का दाखवलं जातंय?, शक्तीप्रदर्शनानंतर शशी थरुर यांचा सवाल

Shashi Tharoor

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगत आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची ही शेवटची संधी होती. परंतु निवडणुकीसाठी केरळमधील पक्षाचे खासदार शशी थरुर, राज्यसभा खासदार पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे आणि झारखंड काँग्रेसचे नेते के. एन. त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गेंनी अर्ज दाखल करताना नेत्यांसह शक्तीप्रदर्शन केलं. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनानंतर शशी थरूर यांनी सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले शशी थरूर?

मला पक्षाच्या नेतृत्वानं कोणताही उमेदवार अधिकृत उमेदवार नसेल असं सांगितलं होतं. मल्लिकार्जुन खर्गेंसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते होते. ज्यांना पक्षाची स्थिती कायम ठेवायची असेल ते खर्गेंना मतदान करतील, ज्यांना बदल हवे असतील ते मला मतदान करतील. सोनिया गांधी यांनी कोणताही उमेदवार अधिकृत उमेदवार नसेल, असं सांगितलं होतं. पण काँग्रेस नेतृत्त्वानं खर्गे यांना अधिकृत उमेदवार का म्हणून दाखवलं जातंय, असा सवाल शशी थरुर यांनी उपस्थित केला.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शशी थरुर, मल्लिकार्जून खर्गे, झारखंडमधील के.एन.त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : नरेश म्हस्केंना अल्झायमर झालाय, राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार