नवी दिल्लीः स्वतःची मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. इंद्राणी मुखर्जीला आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ती 7 वर्षांपासून मुंबईच्या तुरुंगात आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता.
इंद्राणी मुखर्जी ही तिच्याच मुलीच्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. ती 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणीने असा युक्तिवाद केला होता की, तिचा खटला सहा वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. त्यावर आता लवकर कारवाई होण्याची शक्यता नाही. इंद्राणी मुखर्जीला तिच्या ड्रायव्हरने केलेल्या खुलाशानंतर 2015 मध्ये अटक करण्यात आली होती.
शीना बोरा ही पहिल्या पतीची मुलगी होती
या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही सीबीआयने केला, मात्र हे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. हे असे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्याचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की, सुरुवातीला शीना बोराचा मृतदेह सापडल्यानंतर इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केली होती. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.
शीना जिवंत असल्याचा दावा केला होता
गेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता आणि ती काश्मीरमध्ये होती. या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना सांगितले होते की तिची मुलगी जिवंत आहे आणि ती सध्या काश्मीरमध्ये आहे, तपास यंत्रणेने तिचा शोध सुरू करावा.
जवळपास दशकभरापूर्वी मुंबईतील हायप्रोफाईल सोसायटीत ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना घडली होती, ज्यामुळे आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासला गेला होता. तिच्यावर प्रेम करणारा मुलगा नात्यात तिचा सावत्र भाऊ असल्यानं आईला आपल्या मुलीची हत्या करावी लागल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान एकामागून एक इतक्या नाट्यमय घडामोडी समोर आल्या की हे प्रकरण एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखे बनले. एका आईने आपल्या मुलीची हत्या का केली? शीना बोराच्या हत्येनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता.
Supreme Court grants bail to Indrani Mukherjea, prime accused in Sheena Bora murder case.
— ANI (@ANI) May 18, 2022
2 मे 2012 ला रायगडच्या जंगलात मृतदेह सापडला होता
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र छिन्नविछिन्न मृतदेहामुळे ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेहाचा नमुना घेऊन तो फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तीन वर्षांपासून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते, मात्र ठोस निष्पन्न झाले नाही. 2015 मध्ये ड्रायव्हरच्या खुलाशामुळे पोलिसांना या प्रकरणाची उकल करण्यात मदत झाली होती.