Homeदेश-विदेशShiv Jayanti 2024 : आग्र्यातील ‘दिवान-ए-आम’मध्ये पुन्हा ऐकू येणार छत्रपतींची शौर्यगाथा

Shiv Jayanti 2024 : आग्र्यातील ‘दिवान-ए-आम’मध्ये पुन्हा ऐकू येणार छत्रपतींची शौर्यगाथा

Subscribe

आग्रा किल्ल्याच्या 'दिवान-ए-आम'मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा ऐकू येणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्यावतीने आग्र्याच्या किल्ल्यातील दिवान-ए-आममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती ही राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तारखेप्रमाणे ही जयंती साजरी करण्यात येत असून ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने आज राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर आग्रा किल्ल्याच्या ‘दिवान-ए-आम’मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा ऐकू येणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्यावतीने आग्र्याच्या किल्ल्यातील दिवान-ए-आममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र शासन या कार्यक्रमात सहआयोजक असणार आहे. (Shiv Jayanti 2024: Chhatrapati Shivraya’s Shauryagata program at ‘Diwan-e-Aam’ in Agra)

हेही वाचा… Shiv Jayanti 2024 : राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरीवर पोलीस बंदोबस्त

आग्रा किल्ल्यातील दिवान-ए-आममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी भव्य असे व्यासपीठ, आकर्षक देखावे उभारण्यात आले असून आज पुन्हा एकदा दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. तर, या सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो शिवभक्त आग्र्यात दाखल झाले आहेत. डिजिटल माध्यमांतून कोट्यवधी शिवभक्त सहभागी होणार आहेत.

लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पुरातत्व खात्याकडे परवानगी मागितली होती. मात्र, सोहळ्याला परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यक्रमाची तयारी करण्यात आली. ज्यानंतर महाराष्ट्र शासनानेही या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. लाल किल्ल्यातील शिवजयंती सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून, सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने शहरभर फलक लावण्यात आले आहेत. लाल किल्ल्यातील ‘दिवान-ए-आम’मध्ये भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी संगीत सोहळा, शिवजन्म पाळणा, लेझर शोच्या माध्यमातून आग्र्याच्या सुटकेचा इतिहास, पारंपरिक कला प्रदर्शन, शिवजयंती सोहळा तसेच इतर भव्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर पार पडणार आहेत.

देशाच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज लाल किल्ल्यातून मोगल सम्राट औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुखरूप परतले होते. अनेक वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्याचमुळे या किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. आजच्या या सोहळ्यासाठी लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या दिल्लीतील रस्त्यांवर भगवे ध्वज, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. आग्र्यातही ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. लाल किल्ल्यात सोहळ्यासाठी 24 बाय 60 चा स्टेज उभारण्यात आला असून 500 खुर्च्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वच शिवभक्तांचे लक्ष लागून आहे. तर देशभरातील शिवभक्तांसाठी या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठीची व्यवस्थाही अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. दोन कोटी शिवभक्त ऑनलाइन पद्धतीने हा सोहळा पाहतील असे सांगण्यात आले.