घरताज्या घडामोडीशिवरायांच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का? - संजय राऊत

शिवरायांच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का? – संजय राऊत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे सर्वोच्च प्रतिक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारे पुस्तक भाजपने छापले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या नावाचे पुस्तक छापण्यात आले आहे. या पुस्तकावर चहुबाजूंनी टीका होत असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का?” असा प्रश्न राऊत यांनी ट्विटरवर विचारला आहे.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी या विषयाबाबत चार ट्विट केले आहेत. “हे पुस्तक छापणारे जय भगवान गोयल हे पुर्वी शिवसेनेतच होते. मात्र महाराष्ट्र सदनावर हल्ला केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोकांना ही तुलना रुचलेली नाही, असेच दिसून येत आहे.

संजय राऊत यांनी देखील महाराष्ट्रातील भाजपला यावर भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सुर्य… एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज.. छत्रपती शिवाजी महाराज..” असे देखील ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

भाजपचे खासदार कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले आणि सातारा गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले यांनी मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन्ही राजे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे ते काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -