नवी दिल्ली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? त्यांना कोणती अनामिक भीती सतावत आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुलीची दहावी बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर ‘वर्षा’ येथे राहायला जाणार असल्याचा खुलासा केला आहे. त्यांच्या उत्तराचे संजय राऊत यांनी स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस हे ताकही फुंकून पित असल्याचा टोला लगावला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ते दिल्लीत असून येथे ते माध्यमांशी बोलत होते.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर संजय राऊत यांनी काल राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. चेंगराचेंगरीत नेमके किती लोक मारले गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 2000 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती असल्याचे त्यांनी सभागृहात म्हटले, त्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दोन हजार भाविक बेपत्ता, राऊतांनी दावा करत उपस्थित केले प्रश्न
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर केव्हा राहायला जाणार हे सांगितले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. त्यांनी म्हटलं आहे की, मुलीची यंदा दहावी बोर्डाची परीक्षा आहे, परीक्षा झाल्यानंतर वर्षा निवासस्थानी राहायला जाणार आहे. त्यांच्या मुलीला आमच्याही शुभेच्छा. दहावी बोर्डात ती प्रथम यावी.”
‘महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अंधश्रद्धावाल्यांचा बाजार’
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही, याचा अर्थ पत्रकारांमध्येही काहीतरी कुजबूज सुरु आहे. मुख्यमंत्री वर्षावर का रहायला जात नाहीत?. त्यावर मी माझ्याकडची माहिती त्यांना दिली. मीही 40-45 वर्षांपासून पत्रकार आहे. आमच्याकडेही लोक येत असतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर रहायला जावं, ते त्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आमचे मुख्यमंत्री जात नाहीयत, ते ताक फुंकून पितायत असं मला दिसतंय.”
कारवाई करायची असेल तर…
महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे. या कायद्यांतर्गत तुमच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय, “मी काय केलं, माझ्याकडे जी माहिती आहे, त्या संदर्भात मी बोललो. जादूटोण्याचं काही करायचं असले, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांवर करा. ते कामाख्य देवीला जाऊन रेडे कापून आले. सत्तेवर बसले. काही विषय श्रद्धेचे, काही विषय अंधश्रद्धेचे असतात. सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये पाच पावलांचे अंतर आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ वर्षा बंगल्यावर रहायला जावं” असं संजय राऊत म्हणाले.
वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्याची शिंगे पुरलेली
मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवीला कापलेल्या रेड्यांची शिंगे पूरलेली असल्याचा आरोप शिवेसना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपद आपल्याशिवाय इतरांकडे टिकू नये यासाठी त्यांनी मंतरलेली शिंगे ‘वर्षा’च्या लॉनमध्ये पुरली आहेत. असा सनसनाटी आरोप राऊतांनी केला होता. यावर एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : राऊतांचा खळबळजनक दावा; वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली