Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश शिवसेनेची ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच भूमिका आहे आणि राहणार,...

शिवसेनेची ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच भूमिका आहे आणि राहणार, ठाकरे गटाने ठणकावले

Subscribe

मुंबई : तामिळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने नवे वादळ उठले आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बजरंगी बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळ्याच फुटल्या. उदयनिधींना उत्तर त्याच भाषेत द्यायला हवे. ते देण्याचे सोडून ‘इंडिया’ आघाडी आता उदयनिधींवर काय भूमिका घेणार? शिवसेनेचे यावर काय धोरण आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले. ममता बॅनर्जींपासून केजरीवाल, काँग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, शिवसेनेची भूमिका ही जुनीजाणती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच आहे आणि राहणार, असे ठाकरे गटाने ठणकावले आहे.

हेही वाचा – Sanatan Dharma row : भाजपाचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे…, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

दोष तर सर्वच धर्मांत आहेत, पण हिंदू धर्माने हे दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले. सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री-शिक्षण अशा अनेक विषयांवर हिंदू धर्माने प्रगतशील भूमिका घेतली. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला. धर्मातील स्पृश्य–अस्पृश्यता आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले. या बंडापासून सनातन धर्माने धडा घेतला व सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. धर्म जागच्या जागीच आहे; पण अस्पृश्यता, रूढी-परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे वक्तव्य

उदयनिधी काय म्हणाले? ‘‘सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावे लागते. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचे आहे.’’ उदयनिधी यांचे हे विधान त्यांच्या ‘द्रविडी’ भूमिकेशी तर्कसंगत असले तरी देशातील 80-90 कोटी हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – India vs Bharat : नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर…, रोहित पवारांचे भाजपावर टीकास्त्र

‘द्रविडी’ पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक

उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे. दुसरे असे की, द्रविड विरुद्ध सनातन हा संघर्षाचा इतिहासही जुनाच आहे. त्याच संघर्षातून दक्षिणी लोकांचा हिंदी विरोध वाढला. ते हिंदू धर्म, त्यांचे देव, परंपरा मानायला तयार नाहीत. ‘द्रविडी’ पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून घालण्यात आला. द्रविडी लोकांचे अंत्यसंस्कार हे दहन नव्हे, तर दफन पद्धतीने होतात. जयललिता, उदयनिधी स्टालिनचे आजोबा करुणानिधी यांचेही दफन करण्यात आले, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

सनातन विरोध हा अज्ञानावर आधारित

तामीळनाडूत सनातन विरोध इतका टोकाचा आहे की, तेथे ‘पौर्णिमे’ऐवजी अमावास्येला मंगल कार्ये, उद्घाटने, शुभारंभ केले जातात. अशा द्रविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे ही बाब आश्चर्यकारक नाही. जातीयता, आर्थिक भेदभाव व अस्पृश्यता या चिडीतून दक्षिणेत सनातनविरोधात ठिणगी पडली. तशी ती वारंवार महाराष्ट्रातही पडली. भिक्षुकशाही, राजकीय-सामाजिक पेशवाई, जाती-प्रथा याविरोधात महाराष्ट्राने सतत बंड केले. मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला तेव्हा ब्राह्मण असलेल्या साने गुरुजींनी उपोषण आरंभले. जातीयतेचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते. त्यांचे सैन्य, अष्टप्रधान मंडळाची रचना तेच दर्शवते. त्यामुळे द्रविडी नेत्यांचा सनातन विरोध हा अज्ञानावर आधारित आहे व ते त्यांचे प्रांतीय राजकारण आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – ‘इंडिया’मधील भारतीयांकडेही बघा!

पेरियार यांचा संघर्ष अनिष्ट प्रथांविरुद्ध

सन 1924 मध्ये केरळमधल्या त्रावणकोर येथील राजाच्या मंदिरात येण्या–जाण्याच्या रस्त्यावर दलितांना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यातून दलितांनी बंड केले. राजाने ते आंदोलन दडपून टाकले. तेव्हा ई. व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार यांनी त्या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी दीर्घकाळ दलितांच्या हक्कासाठी लढा दिला. तुरंगवास भोगला. पेरियार यांच्याप्रमाणे अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे अनेक कर्ते पुरुष हिंदू धर्मात निर्माण झाले, असे ठाकरे गटाने नमूद केले आहे.

हिंदुस्थानात सनातन धर्म आहे आणि राहील

समाजाला जुन्याच परंपरांत व जोखडात अडकवणारा ‘सनातनी’ विचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील. जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही. त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे आणि राहील, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -