घरदेश-विदेशश्रीमंतांच्या पोरांना अडकवून खंडण्या उकळण्याचा नवा धंदा सुरु केलाय; शिवसेनेचा भाजपवर घणाघात

श्रीमंतांच्या पोरांना अडकवून खंडण्या उकळण्याचा नवा धंदा सुरु केलाय; शिवसेनेचा भाजपवर घणाघात

Subscribe

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. श्रीमंतांच्या पोरांना अडकवून खंडण्या उकळण्याचा नवा धंदा सुरु केलाय, असा घणाघात शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे. सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी संगनमत करून ड्रग्जसंदर्भातले खोटे गुन्हे दाखल करायचे. प्रत्यक्षात भाजपचे हस्तक आणि पदाधिकारी हे अमली पदार्थांच्या व्यवहारात कसे गुंतले आहेत त्याचा पर्दाफाश मुंबईत रोज सुरू आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी ‘जॉइण्ट व्हेंचर्स’ करून ड्रग्जसंदर्भातले खेटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपपुरस्पृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपचे भागभांडवल या उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतले आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. तसंच, पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल? जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे, असा टोला देखील शिवसेनेने लगावला.

- Advertisement -

भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष

“भाजप हा कुटुंबकेंद्रित पक्ष नाही. हा पक्ष एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असे मोदी यांनी सांगितले. कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय?” असा सवाल करत राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे, अशी टीका शिवसेनेने केली.

कोणती घराणी सत्ता चालवतायत हे देशाला माहीत नाही?

“गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही? निवडणुकांसाठी पैसा येतो कुठून? केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या हुकूमावरून राजकीय दाबदबाव आणत असतात? हे विषय दुर्लक्षित करता येत नाहीत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजप हा निवडणूकग्रस्त पक्ष

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नक्की काय घडेल याविषयी बरेच तर्कवितर्क होते, पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत असे ठरले की, देशात १० लाख ४० हजार पोलिंग बूथ आहेत आणि २५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक बूथ स्तरावर भाजपची कमिटी बनवली जाईल. तेथून पंतप्रधानांची ‘मन की बात’ जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. एकंदरीत राष्ट्रीय बैठकीत राजकारण, सत्ता, मोदींचे भजन-कीर्तन याशिवाय काहीच घडले नाही. भाजप हा आपल्या देशातील सगळय़ात जास्त निवडणूकग्रस्त पक्ष आहे. वर्षाचे 365 दिवस ते फक्त निवडणुकांचाच विचार करीत असतात. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते,” असं शिवसेनेने सामानातून म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -