चीन-पाकड्यांचा हैदोस पण सरकार सुस्त; शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्त्र

sanjay-raut-and-uddhav-thackeray
चीन-पाकड्यांचा हैदोस पण सरकार सुस्त; शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्त्र

भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला असून शिवसेनेने यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी आणि धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून केली आहे.

“चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या ‘फेऱ्या’ मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

“सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या भाजपला शोभत नाही

“मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. दहशतवादाच्या भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत. आपली घरेदारे, जमीनजुमले मागे टाकून पळत आहेत. या सगळ्या लोकांचे दुःख पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

देशात किसानही सुरक्षित नाही आणि जवानही…

ठआता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत. पाकिस्तानातून घुसखोरी सुरूच आहे व कश्मीर खोऱ्यातील स्थिती तप्त पाण्यासारखी खदखदत आहे. कश्मीर खोऱ्यातील ३७० कलम हटवले खरे, पण सैन्य हटविण्यासारखी स्थिती अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. देशात किसानही सुरक्षित नाही व जवानही बलिदानच देत आहेत,” असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटलं आहे.