ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्राविरोधात खटला भरा – संजय राऊत

after interval will my entry said shiv sena mp sanjay raut

देशात ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण दगावला नाही, असं लेखी उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिलं. केंद्राच्या या उत्तरावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. संजय राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्राने दिलेल्या ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण दगावला नाहीच्या उत्तराने संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे असा टोला लगावला. “ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले. तसंच, उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका देखील राऊत यांनी केली.

गंगा खोटे बोलते का?

पंतप्रधान वाराणासीत गेले होते. सर्व काही अलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजूलाच गंगा वाहते. सर्वात जास्त प्रेतं गंगेत वाहत होती. म्हणून मी काल त्यांना संसदेत विचारलं, गंगा खोटं बोलते का? काल जे अराजक माजले त्यात ऑक्सिजन अभावी लोक मेले हे सत्य आहे. सरकारने सत्यापासून पळ काढू नये, असं संजय राऊत म्हणाले.

केंद्राने काय उत्तर दिलं आहे?

“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं.