गृहिणींना मोठा धक्का! घरगुती गॅस कनेक्शनच्या किमतीत ७५० रुपयांची वाढ

१६ जून पासून हा दर लागू होणार असून यापूर्वी गॅस सिलिंडरची किंमत १४५० रुपये होती, मात्र आता तुम्हाला गॅस सिलिंडरचे २२०० रूपये द्यावे लागणार आहेत

ग्राहकांसाठी गॅस कनेक्शनबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या घरगुती गॅस कनेक्शनच्या किमतींमध्ये वाढ केली असून, आता जास्तीचे ७५० रूपये खर्च करावे लागणार आहेत. १६ जून पासून हा दर लागू होणार आहे. यापूर्वी कनेक्शनसाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता तुम्हाला यासाठी २२०० रूपये द्यावे लागणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांच्यानी १४.२ किलोच्या एका गॅस सिलिंडर कनेक्शनच्या किंमतीत ७५० रूपयांची वाढ केलेली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही दोन सिलिंडर घेत असाल तर तुम्हाला १५०० रूपये अधिक द्यावे लागतील. तसेच यासाठी ४४०० रूपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रूपये खर्च करावे लागत होते.

रेग्युलेटरसाठी सुद्धा मोजावे लागणार अधिक पैसे
ग्राहकांना आता रेग्युलेटरसाठी १५० रूपयांऐवजी २५० रूपये मोजावे लागतील, तसेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले आहे की, ५ किलोच्या सिलेंडरची सुरक्षा आता ८०० रूपयांऐवजी ११५० रूपये करण्यात आली आहे.

या वस्तूंसाठी इतकी किंमत मोजावी लागणार
गॅस सिलेंडरची किंमत–१०६५
सिलेंडर सुरक्षा किंमत–२२००
रेग्युलेटरसाठी–२५०
पासबुकसाठी–२५
पाईपसाठी–१५०

नव्या कनेक्शनसाठी ३३९० रूपये होणार खर्च
एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला ३३९० रूपये मोजावे लागणार आहेत. इतकंच नव्हे तर तुम्हाला जर स्टोव्ह घ्यायचे असेल तर त्यासाठा तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील.