अमेरिकेत परेडवर गोळीबार; 6 ठार, 24 जखमी

शिकागो : अमेरिकेतील शिकागोच्या हायलँड पार्कमध्ये सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 24 जण जखमी झाले आहेत. गोळीबार कऱणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

परेड सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच एक इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आला. तेव्हा लगेचच परेड थांबविण्यात आली. अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे लोकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांना नंतर परिसरात एक रायफल सापडली. तसेच पोलिसांनी 22 वर्षीय रॉबर्ट क्रिमो याला अटक केली आहे. रॉबर्ट त्यावेळी परिसरातच होता, त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय आहे.

या गोळीबाराच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू आणि 24 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांना सांगितले. मात्र रुग्णालयाच्या सूत्रांनुसार जखमींची संख्या अधिक आहे.

डेन्मार्क पाठोपाठची दुसरी घटना
डेन्मार्कमधील कालच एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली होती. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जण ठार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

मे महिन्यात 29 जणांचा मृत्यू
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वरचेवर घडतच आहेत. मे महिन्यात गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये 29 जणांना जीव गमवावा लागला. टेक्सासमध्ये 24 मे रोजी झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. तर, न्यूयॉर्कमध्ये 14 मे रोजी एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण ठार झाले होते.

हेही वाचा – मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट