Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री

सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री

Subscribe

20 मे रोजी बंगळुरूत होणार शपथविधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासून गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर गुरुवारी सुटला. काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाळ यांनी मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेल्या डी. के. शिवकुमार यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाळ, कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत सातत्याने चर्चा सुरू होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतच्या चर्चेतूनही काही निष्पन्न झाले नाही. अखेर बुधवारी रात्री काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरून झालेल्या चर्चेनंतर डी. के. शिवकुमार एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार शनिवार 20 मे रोजी बंगळुरूत होणार्‍या शपथविधी सोहळ्यामध्ये दोघेही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.

कुरुबा समाजातून आलेले सिद्धरामय्या यांची दलित, ओबीसी आणि मुस्लिमांमध्ये चांगली पकड आहे. त्यांची प्रतिमा धर्मनिरपेक्ष आहे, तर शिवकुमार ज्या वोक्कलिगा समुदायातून येतात तो समुदाय कर्नाटकात केवळ 11 टक्के आहे. त्याशिवाय शिवकुमार यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीचा तपासदेखील सुरू आहे. त्यातच केंद्राने शिवकुमार यांचे कट्टर विरोधक प्रवीण सूद यांना सीबीआयचे संचालक बनवले आहे. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास भाजपला आक्रमक होण्याची आयती संधी मिळेल अशी भीती काँग्रेसला होती. या सर्व कारणांमुळे शिवकुमार यांची बाजू कमकुवत झाल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

१३ मे रोजीच्या निकालात कर्नाटकच्या जनतेने 135 आमदारांच्या बहुमतासह सत्तेची माळ काँग्रेसच्या गळ्यात घातली. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाचा पेच सुरू झाला होता. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस निर्माण झाली होती. दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले होते. त्यामुळे या पदाचा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह 3 सदस्यीय निरीक्षण समितीही स्थापन करण्यात आली, तर काँग्रेसच्या विधिमंडळ गटाने मुख्यमंत्री निवडीचे अधिकार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती सोपवले होते. त्रिसदस्यीय समितीने खर्गे यांच्याकडे अहवाल सोपवल्यानंतर दिल्लीतील बैठका सुरू झाल्या. अखेर या प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्रीपदाचा पेच संपुष्टात आणला.

2024 नंतर शिवकुमार यांच्या हाती धुरा
सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात फिफ्टी फिक्टी फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे समजते. त्यानुसार 75 वर्षीय सिद्धरामय्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहतील. त्यानंतर शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात येईल. सिद्धरामय्या यांना प्रत्येक निर्णयात शिवकुमार यांची मंजुरी बंधनकारक असेल. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची खाती आणि प्रदेशाध्यक्षपदही राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शपथविधी सोहळ्यात विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन
या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शन म्हणून काँग्रेसने या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सपा प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांना निमंत्रण दिले आहे.

सर्व काही ठीक आहे आणि यापुढेही सर्व चांगले होईल. आपल्या सर्वांना एकत्र काम करायचे आहे आणि ते आपण स्वीकारले आहे, असे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे, असे डी. के. शिवकुमार म्हणाले. त्यांनी गुरुवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दरम्यान, २० तारखेला शपथविधी होणार आहे. त्याआधी शिवकुमार पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

- Advertisment -