Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सिंधुदुर्गात कळणे खनिज प्रकल्पातील बांध फुटला

सिंधुदुर्गात कळणे खनिज प्रकल्पातील बांध फुटला

Related Story

- Advertisement -

आज गुरूवारी सकाळी अचानक सिंधुदुर्गातील कळणे खनिज प्रकल्पाचा बांध फुटून खनिजमाती मिश्रित पाणी( चिखल ) परिसरातील शेतात आणि मानवी वस्तीत घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .पाण्याचा वेगाने एका घराभोवती उभारलेली चिऱ्याची भिंत ही कोसळली. खाणीतील पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की वाटेत येणारी झाडे प्रवाहाने आडवी केली. कळणे तळकट मार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यात झाडे पडल्याने मार्ग बंद झाला होता. विद्युत खांबही वेगवान प्रवाहामुळे जमीनदोस्त झाले. ही घटना सकाळी आठ साडे आठच्या दरम्यान घडली.

स्फोटासारखा आवाज आल्याने शेतात काम करणारे शेतकरी, नांगरणी करणारे शेतकरी बैलांसह पळाले.त्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह सुसाटत आला आणि काही मिनिटात त्याने शेतजमीन आणि मानवी वस्ती व्यापून टाकली. त्याही स्थितोत स्थानिकांनी घरातील लोकांना बाहेर काढले. या घटनेत शेती बागायती आणि मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. कळणे खनिज प्रकल्पाकडून झालेले बेसुमार उत्खनन आणि अशा दुर्घटना घडू नये म्हणून त्यांनी घ्यावयाची दक्षता न घेतल्याने आजची दुर्घटना घडल्याचे प्रतिसाद उमटत आहेत . आता पाणी बंद केले असले तरी भविष्यात संकटाची टांगती तलवार कळणेवासीयांवर कायम आहे.

- Advertisement -

स्थानिकांनी दुर्घटनेची माहिती प्रशासनाला दिल्यावर तहसीलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ घटनास्थळी दाखल झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी खनिज कंपनीवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थनी केली. व जोपर्यंत घरांचे, शेताचे, सर्व नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोपर्यंत प्रशासनातील कुणीही अधिकाऱ्याने कळणे सोडायचे नाही असा आग्रह धरला. खानोलकर यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त व्यक्तीला शासनाकडून आणि खनिज कंपनीकडून योग्य भरपाई मिळवून दिली जाईल असे सांगितले. खनिज प्रकल्पामुळे गाव धोक्यात येवू शकतो त्यामुळे उत्खनन बंद करण्याची मागणी सातत्याने करूनही त्या सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप केला. खनिज कंपनी इतकेच ते सर्वजण गावकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार आहेत असे सांगून आता तरी खनिज प्रकल्प बंद करा अशी मागणी केली.


 

- Advertisement -