मनीष सिसोदिया यांची कोर्टात हजेरी, ‘आप’ रस्त्यावर उतरणार; दिल्लीला छावणीचे रूप

मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी रात्रीच चौकशीदरम्यान अटक केली होती. मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारलंय.

Manish-Sisodia
उत्पादन शुल्क घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारलंय.

उत्पादन शुल्क घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारलंय. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी दिल्लीत अलर्ट जारी केला आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी रात्रीच चौकशीदरम्यान अटक केली होती. सिसोदिया यांच्यावर २०२१-२२ या वर्षासाठी उत्पादन शुल्क धोरण जारी करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेपूर्वी सीबीआयने त्यांची सुमारे आठ तास चौकशी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याला गलिच्छ राजकारण म्हटलं आहे. सिसोदिया यांना अशाप्रकारे अटक केल्यामुळे देशवासीयांमध्ये संताप आहे आणि जनता त्याला नक्कीच उत्तर देईल, असे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले. यापुढे बोलताना ते म्हणाले की, सिसोदिया यांनी दिल्लीतील शिक्षण आणि औषधोपचारावर खूप काम केलं आहे. त्यामुळे लाखो दिल्लीकरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. “आम्ही तुरुंगात आहोत की बाहेर याने आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही भगतसिंग यांना मानणारे आणि कट्टर प्रामाणिक आहोत. आमचा प्रामाणिकपणा हेच त्यांना उत्तर असेल.” असं देखील अरविंद केजरीवाल म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता ठेवण्याचे आवाहन केलं आहे. यासोबतच प्रभाग आणि विधानसभा स्तरावरील कामगिरीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने सीबीआय कार्यालयाबाहेर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे.

शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक आणि अदानी यांच्याशी मैत्री याविरोधात आम आदमी पक्ष आज देशभरात निदर्शने करून ‘काळा दिवस’ साजरा करणार आहे. याबाबत पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी माहिती दिली. आज भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयावर दुपारी १२ वाजता आंदोलन करणार आहेत.