मॉर्निंग वॉक जिवावर बेतला; वाहनाने चिरडल्याने ६ जणांचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

मॉर्निंग वॉकला जाणे आज सहा जणांच्या जीवावर बेतले. एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यापैकी ४ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांचा रुग्णालयात गेल्यावर मृत्यू झाला. ते सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील कुम्हेर तालुक्यात आज गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर सदर वाहनचालक फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार कुम्हेर येथील गुदडी भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक सवयीप्रमाणे भल्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेथील धनवाड रस्त्यावर मॉर्निंग वॉक घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला ते योगासने करत होते. त्याचवेळेस भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून जवळपासचे लोक मदतीसाठी धावले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र सदर वाहनाबद्दल काही माहिती कळू शकली नाही. प्रत्यक्षदर्शींपैकी काहींनी हे वाहन पिक अप, तर काहींनी कार असल्याचे सांगितले आहे.

रघुवीरसिंह बघेल (62), प्रेमसिंह (55) निरोती लाल सैनी (65), मक्खन लाल नागर (60), हरि शंकर (62) आणि रामेश्वर (60) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. टायरचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस अधिक तपास करत आहेत.