भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची एंट्री, ब्रिटनहून आले ६ कोरोनाबाधित!

six uk returnees people tested positive for new coronavirus covid 19 strain in india

कोरोना व्हायरसचा कहर अद्याप संपलेला नाही आहे. आता कोरोनाचा नवा स्ट्रेन चिंता वाढवत आहे. भारतात कोरोना व्हायरसचा नव्या स्ट्रेनने एंट्री केल्याचे समोर आले आहे. भारतात ब्रिटनहून आलेल्या ६ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आढळल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती भारत सरकारने दिली आहे. ब्रिटनहून आलेल्या ६ जणांपैकी ३ जणांचे बंगळुरू, २ जणांचे हैदराबाद आणि एकाचे पुण्याच्या लॅबमध्ये नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यादरम्यान या प्रवाशांमध्ये नवी स्ट्रेनची लक्षणे आढळली आहेत.

देश कोरोनाच्या संकटातून सावरत असताना तोवर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतात एंट्री केली आहे. ब्रिटनहून भारतात आलेले ६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामधील तीन नमुन्यांची चाचणी NIMHANS, बंगळूरू येथे झाली. याशिवाय २ नमुन्यांची चाचणी CCMB, हैदराबाद आणि १ नमुन्याची चाचणी NIV पुण्यात झाली आहे. दरम्यान ज्या लोकांच्या नमुन्यांमध्ये नवा स्ट्रेन आढळला आहे, त्यांना त्या त्या राज्य सरकार मार्फत निर्देश दिले गेले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुममध्ये आयसोलेटेड केले आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ४३२ नवे कोरोनाबाधित आढळले असून २५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २४ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २ लाख २४ हजार ३०३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला असून ९८ लाख ७ हजार ५६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात २ लाख ६८ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Coronavirus: आता दक्षिण कोरियात पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन