स्मृती इराणींकडे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची तर ज्योतिरादित्य सिंधियांकडे पोलाद मंत्रालयाची जबाबदारी

smriti irani and jyotiraditya scindia gets additional charge of minority affairs and steel ministry after two minister resigns from modi cabinet

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर रामचंद्र प्रसाद सिंग यांनी पोलाद मंत्रालयाचा राजीनामा दिल्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधियांकडे या मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.

भारताचे राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींच्या सल्लानुसार, घटनेच्या कलम 75 च्या कलम (2) अंतर्गत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार, स्मृती इराणी यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त अल्पसंख्याक मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. यासह राष्ट्रपतींनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त पोलाद मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

आज (६ जुलै) मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते अल्पसंख्याक व्यवहार खाते सांभाळत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नक्वी यांनी राजीनामा दिला. नक्वी यांनी आज त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्री म्हणून नक्वी यांच्या योगदानाचे कौतुक केले.

यासोबतच पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांचीही आज अखेरची कॅबिनेट बैठक झाली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निरोप देताना सांगितले की, या दोघांनी मंत्री असताना देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. मुख्तार हे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपने नक्वी यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो, असे मानले जात आहे.


इलैयाराजा, पी टी उषा राज्यसभेवर जाणार, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती