Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ...तर न्यायालये बंद करा, असदच्या एन्काऊंटरवरून ओवैसीची टीका

…तर न्यायालये बंद करा, असदच्या एन्काऊंटरवरून ओवैसीची टीका

Subscribe

नवी दिल्ली : उमेश पाल हत्येप्रकरणी दीड महिन्यांपासून फरार असलेला माफिया अतिक अहमदचा मुलगा असद याला यूपी एसटीएफने गुरुवारी (13 एप्रिल) झाशी येथे एका चकमकीत ठार मारले. त्याच्यासोबत त्याचा साथीदार शूटर गुलाम यालाही ठार करण्यात आले आहे. याप्रकरणी सपा – एमआयएमसह अनेक विरोधी पक्षांनी भाजपा सरकारला घेरले आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

उमेश पालच्या हत्येनंतर 48व्या दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांनी असद आणि शूटर गुलामचे एन्काऊंटर (Asad Encounter) केले. असद आणि गुलाम दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान आदी ठिकाणी लपून राहिले होते. असद अहमदच्या एन्काऊंटरबाबत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी निजामाबादमध्ये बोलताना, जुनैद आणि नसीर यांना ज्यांनी मारले, त्यांचेही एन्काऊंटर करणार का? असा सवाल केला. पण एन्काऊंटर केले जाणार नाही, कारण धर्माच्या नावाखाली चकमकी केल्या जातात. या चकमकींमुळे कायद्याची पायमल्ली होत आहे, असे ते म्हणाले. गोळ्या घालून न्याय करणार अशी तुमची भूमिका असेल तर न्यायालये बंद करा, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

खरं तर, या वर्षी फेब्रुवारीमध्ये हरियाणाच्या भिवानी भागात दोन पुरुषांचे सांगाडे सापडले होते. हे पुरुष सांगाडे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात राहणाऱ्या जुनैद आणि नसीर या दोन तरुणांचे असल्याचे सांगण्यात आले. दोघांची हत्या झाली होती. बोलेरोमध्ये दोघांना जाळण्यात आले होते. बोलेरो गाडीचा चेसीस क्रमांक आणि घटनाक्रम यावरून पोलिसांनी मृताची ओळख पटवली होती.

- Advertisement -

मूळ मुद्द्यावरून लक्ष हटविण्याचा भाजपाचा प्रयत्न
सपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही याप्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली. खोट्या चकमकी करून भाजप सरकार मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचा न्यायालयावर अजिबात विश्वास नाही. चकमकींची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

विकास दुबेच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती खरी ठरली
अतिक अहमदचा मुलगा आणि त्याच्या साथीदाराला पोलीस चकमकीत मारल्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. विकास दुबेच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती खरी ठरल्याचे लोकांना वाटते. घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती व सत्य जनतेसमोर यावे यासाठी उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे, असे बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या.

- Advertisment -