घर क्राइम आर्थिक लाभासाठी काही डॉक्टर आपला पेशा बदनाम करतायत, ओरिसा हायकोर्टाची टिप्पणी

आर्थिक लाभासाठी काही डॉक्टर आपला पेशा बदनाम करतायत, ओरिसा हायकोर्टाची टिप्पणी

Subscribe

भुवनेश्वर : भारतात परमेश्वरापाठोपाठ डॉक्टरांना महत्त्व दिले जाते. मात्र काही डॉक्टर आर्थिक लाभासमोर मानवी जीव गौण समजतात. अशा डॉक्टरांमुळे हा उदात्त व्यवसाय बदनाम होत आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पण ओरिसा उच्च न्यायालयाने केली आहे.

डॉ. विश्वमोहन मिश्रा हे भुवनेश्वर महानगरपालिकेच्या रुग्णालयात मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत होते. 1 जुलै 2009 रोजी, एका महिला रुग्णाला या रुग्णालयातील मेडिसिन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, जेथे डॉ. मिश्रा त्याच्यावर उपचार करत होते.

- Advertisement -

हिमोग्लोबिन कमी असल्याने या रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे तिच्या काकांनी डॉ. मिश्रा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने तिला रक्त देण्याची विनंती केली. त्यावर रुग्णालयाकडून रुग्णाला रक्त देण्याचे आश्वासन दिले, परंतु तसे झाले नाही. त्यानंतर मध्यरात्री रुग्णाचा मृत्यू झाला. कथित निष्काळजीपणामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टरवर आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 304-Aअंतर्गत (निष्काळजीपणामुळे मृत्यू) एफआयआर दाखल करण्यात आला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत डॉ. मिश्रा यांनी, आपल्याविरोधात खटला करण्याच्या दृष्टीने प्रथमदर्शनी तरी कोणतेही परावे नाहीत, असा दावा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ महिला देखील कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करू शकतात, केरळ हायकोर्टाचा निर्णय

याचिकाकर्त्या डॉक्टरच्या गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती पडताळण्याच प्रश्न आहे. पुरावे मिळाल्यानंतर खटल्याच्या सुनावणीत याचे उत्तर मिळेल. तथापि, तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्यांची काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर प्रथमदर्शनी तरी याचिकाकर्त्याविरोधात खटला चालवता येऊ शकतो, असे दिसते, असे मत न्यायालयाने नोंदवले.

खटल्यातील तथ्यांची दखल घेत न्यायालयाने सुरुवातीलाच, डॉ. सुरेश गुप्ता विरुद्ध दिल्ली सरकार आणि अन्य, 2004 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला. रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकेल इतके, एखाद्या डॉक्टरचा निष्काळजीपणा आणि त्याचे कृत्य बेपर्वाइचे असेल तर, त्याच्यावर आयपीसीच्या 304-एअंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात म्हटले असल्याचे ओरिसा न्यायालयाने सांगितले.

हेही वाचा – निर्दोषमुक्त ठरवलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी माजी खासदारास सर्वोच्च न्यायालयाचा झटका; वाचा सविस्तर…

योग्य उपचारासाठी 1 जुलै 2009 रोजी रात्री 10.45 ते 12.25 वाजेदरम्यान वारंवार दूरध्वनीवरून विनंत्या केल्यानंतरही याचिकाकर्त्याने (डॉ. मिश्रा) रुग्णालयात येण्यास नकार दिला. रुग्णाला अन्य खासगी नर्सिंग होममध्ये हलवण्याची सूचना त्यांनी फोनवरून दिली, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले असून त्याची दखल न्यायालयाने घेतली. त्यानंतर न्यायालयाने डॉ. मिश्रा यांची याचिका फेटाळली.

- Advertisment -