आधी घोषणेतून विरोध आता माफी मांगो राज ठाकरे…अगर अयोध्या आना है गाणं व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या या अयोध्या यात्रेला उत्तर प्रदेशमधून तीव्र विरोध होत आहे. भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही अशी मागणी केली आहे. यावर मनसेही आक्रमक झाली असून ५ जून रोजी उत्तर प्रदेशमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. याचदरम्यान राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी असे हिंदी गाणेही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याचे बोल माफी मांगो राज ठाकरे ..अगर अयोध्या आना है असे आहेत. यावर मनसेकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र राज ठाकरेंना डिवचण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात वातावरण अधिक तापवण्यासाठीच असे प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या हिंदु्त्वाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या राज ठाकरेंनी याआधी महाराष्ट्रातील, मुंबईतील परप्रांतियांविरोधात रोखठोक भूमिका घेतली होती. मराठी भाषा ते भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य या मुद्द्यावरून मनसेने परप्रांतियांना विशेषत उत्तर भारतीयांना सळो की पळो करुन सोडले होते. अनेकवेळा मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाला , रिक्षावाला यांना मारहाणही करण्यात आली होती. यामुळे उत्तर भारतीयांच्या मनात मनसे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. मात्र ज्यावेळी राज यांनी हिंदुत्वाचे रणशिंग फुंकत भगवे वस्त्र परिधान केले. भोंग्याला विरोध करताना मशिदींसमोर हनुमान चालीसा पठन करण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना देत थेट अयोध्येत जाण्याची घोषणा केली ते बघून सगळेच अवाक् झाले. उत्तर भारतीयांनाही हिंदुत्वाच्या मुद्यामुळे राज आपले वाटू लागले. राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा आदेश संबंधितांना दिला. त्यानंतर मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील धर्मस्थळांवरील भोंगे काढण्याचे फर्मानच सोडले. यामुळे योगींचा राज ठाकरेंना पाठींबा असल्याचे बोलले जाऊ लागले. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरेंनीही योगींचे आभार मानले.

त्यानंतर राज ठाकरेंच्या अभिनंदनाचे फोटो, पोस्टर्स युपीमध्ये झळकू लागले. मात्र काही दिवसातच चित्र पालटले आणि उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंविरोधात युपीतील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी रणशिंग फुंकले. काहीही झाले तरी उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.  नंतर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा दिला. ब्रिजभूषण यांच्या या भूमिकेला तेथील अनेक उत्तर भारतीय संघटनांनी देखील पाठींबा दिला असून अयोध्येत राज ठाकरे यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. यावर रोज मोर्चेही काढण्यात येत असून राज यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात पोस्टर्सबाजीही करण्यात येत आहे.

आता राज यांना विरोध दर्शवणारे गाणेच काढण्यात आले असून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या गाण्यात राज ठाकरेंना अयोध्येत यायच असेल तर त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही असे आमच्या नेत्याने म्हटले आहे. तसेच आम्ही रामाचे वंशज असून तुम्ही रामाचाही अवमान केला आहे. उत्तर भारतीयांना अपराधी म्हणणारे तुम्ही पापी आहात. राजकीय फायद्यासाठी तुम्ही अयोध्येला येणार आहात हे आम्हांला माहित असल्याचे या गाण्यात सांगण्यात आले आहे. तसेच ५ जूनला जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी अयोध्येला यायचे आहे असे आव्हान या गाण्यात उत्तर भारतीयांना करण्यात आले आहे.