काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

७६ वर्षीय सोनिया गांधी यांना गुरुवारी ताप आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांचे पथक सोनिया गांधी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असे सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकांनी सांगितले. 

Sonia Gandhi

नवी दिल्लीः कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप आल्याने सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी जानेवारी महिन्यात सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

७६ वर्षीय सोनिया गांधी यांना गुरुवारी ताप आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांचे पथक सोनिया गांधी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असे सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने सांगितले.

कॉंग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे दरम्यान माझी अध्यक्षपदाची इनिंग संपली, ही फार समाधानाची बाब ठरली, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या चर्चांना अखेर सोनिया गांधी यांनीच समोर येऊन उत्तर दिले. याआधी कधी राजकीय निवृत्ती ना घेतली, ना यापुढे कधी घेणार आहे, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.

या भाषणात सोनिया गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारर्किदीचा आढावा घेतला. 1१९९८ मध्ये मी पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाले. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे गेल्या २५ वर्षांत अनेक चढ-उतार बघितले. अनेक चांगले तर, काही वाईट अनुभव आले. २००४ आणि २००९ मधील पक्षाची कामगिरी असो किंवा मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याचा माझा निर्णय असो, वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हे समाधानकारक होते. या सर्वांत मला कार्यकर्त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले. मला सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. पक्षासाठी हा टर्निंग पॉइंट आहे, असे त्या म्हणाल्या.

सोनिया गांधी यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, यात्रा काँग्रेससाठी महत्त्वाची ठरली आहे. यात्रेने दाखवून दिले की भारतीय नागरिकांना एकमेकांबद्दल आदर, सद्भाव, आणि समानतेची आपेक्षा आहे.