नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या ताफ्याचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी (20 फेब्रुवारी) बर्दवानला जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. अचानक एक लॉरी मध्यभागी आली त्यामुळे वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागले. पण, दिलासादायक बाब म्हणजे सौरव गांगुली किंवा त्याच्यासोबत असलेल्या कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना हुगळीच्या दादपूर येथील दुर्गापूर एक्सप्रेसवेवर घडल्याची माहिती देण्यात आली आहे. (Sourav Ganguly convey met with accident on durgapur expressway no injuries reported)
हेही वाचा : Ladki Bahin : 9 लाख महिला अपात्र अन् फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच, वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीच्या ताफ्यासमोर एक लॉरी होती जिने अचानक ब्रेक लावला. गांगुलीच्या गाडीच्या चालकाने वेळीच ब्रेक लावला, तरी ताफ्यामागून येणाऱ्या दोन गाड्यांमध्ये किरकोळ टक्कर झाली. दादपूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेमध्ये सौरवच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही. सौरवलाही दुखापत झाली नाही. या धडकेत ताफ्यातील दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. तसेच चालकांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण, दुर्घटना घडली त्यावेळेस काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अपघातानंतर सौरव गांगुलीने बर्दवान विद्यापीठाच्या गुलाबबाग कॅम्पसच्या सभागृहात विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, त्याला बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशनने सन्मानित केले. मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीची मुलगी सनादेखील त्याच्यासोबत होती. ती वाहनचालकाच्या शेजारी बसली असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी आरोपी लॉरी चालकाला अटक केली. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सौरव गांगुली हा भारताचा आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. सौरव गांगुलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,363 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यामध्ये त्याच्या नावावर 22 शतके आणि 52 अर्थशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 7 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वात भारताने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. तर, त्याने काही काळ बीसीसीआयचा चेअरमन म्हणून काम केले आहे.