घरदेश-विदेशकोरोनातून सुटले अन् चेंगराचेंगरीत अडकले, 300हून अधिक लोकांनी गमावला जीव

कोरोनातून सुटले अन् चेंगराचेंगरीत अडकले, 300हून अधिक लोकांनी गमावला जीव

Subscribe

मुंबई : कोरोना या महामारीने जवळपास दोन वर्षांपूर्वी जगभरात हात-पाय पसरले. त्याच्या सावटाखाली सर्वच देश होते. सर्वच देशांत निर्बंध लागू होते. पण या विषाणूचा प्रादूर्भाव कमी होऊ लागताच, निर्बंधही हटविण्यात आले. त्यामुळे दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा उत्साह दुणावला. कोरोना निर्बंधमुक्त झाल्यावर अनेक देशांमध्ये धार्मिक कार्यक्रम, उत्सवानिमित्त एकत्र येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली. त्याची परिणती ठिकठिकाणी चेंगराचेंगरीत झाली आणि यंदाच्या जानेवारीपासून 300हून अधिक लोकांनी जीव गमावला.

दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये शनिवारी (29 ऑक्टोबर) हॅलोवीन फेस्टिवलनिमित्त आयोजित कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 151 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100हून अधिक जखमी झाले आहेत. हॅलोविन फेस्टिवलमध्ये जमलेल्या काहींचा चेंगराचेंगरीमुळे, गुदमरून तर काहींचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत अद्याप 2000हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच दक्षिण कोरियामध्ये नो मास्क हॅलोवीन साजरा करण्यासाठी लाखो लोक जमले होते.

- Advertisement -

इंडोनेशियात फुलबॉल मॅचदरम्यान चेंगराचेंगरी

इंडोनेशियामध्ये 2 ऑक्टोबरला फुटबॉल सामान्यादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली, या चेंगराचेंगरीत तब्बल 174 जणांचा जागीच मृत्यू झाला, 180हून अधिकजण जखमी झाले होते. पूर्व जावामधील मलंग रिजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमवर इंडोनेशियन टॉप लीग BRI लीग-1च्या फुटबॉल सामन्यादरम्यान ही घटना घडली. या घटनेबाबत आजही जगातील क्रीडा क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होते.

- Advertisement -

इजिप्तमध्ये चर्चमध्ये चेंगराचेंगरी

इजिप्तच्या गिझा शहरातील अबू सेफिन चर्चला 14 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीमुळे चेंगरीचेंगरीची घटना घडली, या घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास पाचजण जखमी झाले होते. घटनेवेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी 5 हजार लोक उपस्थित होते. चर्चमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे लोक सैरावैरा पळू लागले. यामुळे चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाली.

वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी

जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चेंगराचेंगरीची घटना समोर आली होती. या घटनेत 15हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास तेवढेच भाविक जखमी झाले होते. नवीन वर्षानिमित्त वैष्णोदेवी देवीच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

देशभरात अन्यही घटना

पुणे रेल्वेस्थानकावरही 22 ऑक्टोबरला चेंगराचेंगरीची घटना समोर आली होती. पुणे- दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढताना झालेल्या या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर, 20 ऑगस्टला मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन दोन भाविकांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 8 ऑगस्टला राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडताच चेंगराचेंगरी झाल्याने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते.


आमदार राणा अन् कडूंच्या वादात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; मुंबईत बोलावली तातडीची बैठक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -