घरदेश-विदेशआझम खान यांनी अखेर रमादेवींबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर माफी मागितली

आझम खान यांनी अखेर रमादेवींबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर माफी मागितली

Subscribe

लोकसभेत तालिका अध्यक्ष रमा देवी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर टीकेच्या केंद्रस्थानी सापडलेले समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी या वक्तव्याप्रकरणी अखेर माफी मागितली आहे.

लोकसभेमध्ये अध्यक्षस्थानी असलेल्या रमादेवी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर अखेर समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी माफी मागितली आहे. सभा अध्यक्षांचा अपमान करण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. तसा झाला असेल तर आपण माफी मागतो असं त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून बराच वाद सुरू होता. लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविषयी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आझम खान यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सभागृहात उपस्थित कॅबिनेट मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी त्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आणि आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र, आपण कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही, असं आझम खान यांनी तेव्हा ठामपणे सांगितलं होतं. मात्र, सत्ताधारी खासदार आणि माध्यमांच्या दबावानंतर अखेर त्यांनी सोमवारी माफी मागितली आहे.

- Advertisement -

…आणि आझम खान यांनी माफी मागितली

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकत अखेर आझम खान यांनी लोकसभेत माफी मागितली. ते म्हणाले, ‘सगळे म्हणतात तशी कोणतीही भावना अध्यक्षांप्रती (रमादेवी) नव्हती. माझं बोलणं आणि वागणं संपूर्ण सभागृहाला माहिती आहे. तरीही दर अध्यक्षांना असं वाटत असेल की माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी त्यासाठी माफी मागतो’.

काय म्हणाले होते आझम खान?

२५ जुलै रोजी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान सभा अध्यक्ष रमादेवी यांना संबोधून आझम खान म्हणाले, ‘आप मुझे इतनी अच्छी लगती है की मेरा मन करता है की आप की आखों में आँखे डाले रहूँ’. या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला होता.

- Advertisement -

रमादेवींची पुन्हा टीका!

दरम्यान, आझम खान यांनी माफी मागितल्यानंतर देखील रमादेवी यांनी त्यांच्यावर सभागृहात टीका केली. त्या म्हणाल्या, ‘आझम खान यांची सवय गरजेपेक्षा जास्त बिघडली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे माझाच नाही, तर देशातल्या सर्व स्त्री-पुरूषांचा अपमान झाला आहे. मी इथे अशा प्रकारची वक्तव्य ऐकण्यासाठी आलेली नाही’.


पाहा संसदेतल्या इतर महिला खासदार काय म्हणतायत – आझम खानच्या वक्तव्यावर महिला खासदारांची नाराजी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -