विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंग नियमात बदल

पहिल्या टप्प्यात देशातील १५ वातानुकूलित रेल्वेच्या ३० फेऱ्या सुरु केल्या आहे. मात्र, आता या विशेष रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगच्या नियम आणि अटींमध्ये भारतीय रेल्वेकडून सुधारणा केली आहे.

भारतीय रेल्वेसेवा सुरळीत सुरु करण्यासाठी १२ मे पासून ३० विशेष रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात देशातील १५ वातानुकूलित रेल्वेच्या ३० फेऱ्या सुरु केल्या आहे. मात्र, आता या विशेष रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगच्या नियम आणि अटींमध्ये भारतीय रेल्वेकडून सुधारणा केली आहे. त्यानुसार आता प्रवाशांना या गाड्यांचे आगाऊ आरक्षण कालावधी ७ दिवसांवरून वाढवून आता ३० दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वेने १२ मे पासून ३० विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० वातानुकूलित ट्रेन सुरु केल्या आहेत. या ट्रेन नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रल, आगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तवीला या शहरासाठी या गाड्या धावत आहे. पूर्वी या गाडयांचे आगाऊ तिकीट आरक्षित करण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आता रेल्वेने तिकीट आरक्षणाचा आणि अन्य नियमात बदल केले आहे. ज्यामध्ये या गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी ७ दिवसांवरून वाढवून आता ३० दिवस करण्यात येणार आहे. तसेच  लागू असलेल्या नियमांनुसार या गाड्यांची आरएसी/प्रतीक्षा यादी तिकिटे दिली जातील.

तथापि विद्यमान सूचनेनुसार प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही. पहिला चार्ट ट्रेन सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या कमीत कमी ४ तास आधी आणि दुसरा चार्ट ट्रेन सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान २ तास आधी तयार होईल (पूर्वी हा चार्ट 30 मिनिट आधी तयार असायचा). प्रथम आणि द्वितीय चार्ट दरम्यान चालू (करंट) बुकिंग करण्याची परवानगी दिली जाईल. ट्रेनमधील आरक्षणासाठी वरील बदलांची अंमलबजावणी २४ मे पासून होईल आणि ३१ मे रोजी किंवा त्यानंतर सुरू होणार्‍या गाड्यांना हे लागू होईल.