एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादा १४० किमी प्रतितास व्हावी

Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वैयक्तिक मत

एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती १४० किलोमीटर प्रतितास करण्यात यावी, हे माझे वैयक्तिक मत आहे. चार लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर वेगमर्यादा कमीत कमी १०० किलोमीटर प्रतितास असली पाहिजे, तर दोन लेन असलेल्या मार्गांवर आणि शहरी रस्त्यांसाठी वेगमर्यादा क्रमश: ८० किलोमीटर प्रतितास आणि ७५ किलोमीटर प्रतितास असली पाहिजे, असे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह – २०२१ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, भारतात वाहनांच्या वेग मर्यादेचा मापदंड निश्चित करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारच्या वेगाबद्दल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे काही निर्णय आहेत, ज्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आहोत. आज देशात असे एक्स्प्रेस वे बनले आहेत की, त्या मार्गांवर कुत्रं देखील येऊ शकत नाही. कारण, मार्गाच्या दोन्ही बाजुने बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे.

विविध श्रेणींमधील मार्गांसाठी वाहनांची कमला वेग मर्यादेत सुधारणा करण्यासाठी एक फाइल तयार करण्यात आलेली आहे. लोकशाहीत आपल्याला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधीशांना कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार आहे. भारतीय मार्गांवर वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करण्यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केले जाईल, असेही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवले.