राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी चिघळली; आणीबाणी जाहीर

कोलंबो : आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी आज देश सोडून पलायन केले. याची माहिती कळताच संतप्त श्रीलंकन नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याने तेथील परिस्थिती आणखी चिघळली आहे. त्यामुळे तिथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

विदेशी चलनाचा तुटवडा झाल्याने श्रीलंकेतील इंधन व अन्य सामग्रीची आयात पूर्णत: ठप्प झाली आहे. मुळात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड टंचाई असल्याने महागाई गगनाला भिडली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. ते सर्वमान्य नेते असल्याने त्यांनी पाचव्यांदा देशाचा कारभार आपल्या हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, ते युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) एकमेव खासदार आहेत.

पण देशाची आर्थिक घडी रुळावर येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसताना राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे हे आज सकाळी हवाई दलाच्या विमानातून मालदिवला गेले. खुद्द राष्ट्रपतींनीच पलायन केल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या संतप्त नागरिकांना थेट पंतप्रधान निवासस्थान गाठले आहे. तर, काहींनी संसद भवनाकडेही मोर्चा वळवला. मात्र तिथे आधीपासून सैन्य तैनात करण्यात आले आहे. या संतप्त नागरिकांना पांगविण्यासाठी सैन्याकडून अश्रूधुराचा वापर करण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक तिथून हटलेले नाहीत.

राष्ट्रपतीच राजपक्षे यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार पंतप्रधान हेच आता हंगामी राष्ट्रपती आहेत. देशातील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून त्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.