श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे पळाले मालदिवला; मदत केल्याचा भारताकडून इन्कार

कोलंबो : आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालली आहे. त्यामुळे श्रीलंकन नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी पंतप्रधानांचे खासगी बंगला पेटवून दिला. तसेच थेट राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचाही ताबा घेतला. नागरिकांचा हा उद्रेक पाहून राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे मालदिवला पळाले. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

वांशिक हिंसाचारामुळे धुमसणारा श्रीलंका हा देश गेल्या सात-आठ वर्षे स्थिरावत होता. पण आता विदेशी गंगाजळी आटल्याने श्रीलंकेत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल-डिझेल-गॅस या इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवत असून महागाईचा आगडोंब उसळला आहे. परिणामी नागरिक आक्रमक झाले. त्यांनी थेट राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे निवासस्थानावर चाल करत त्याचा ताबा घेतला. तर, काहींनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचेही निवासस्थान पेटवून दिले. या पार्श्वभूमीवर रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

तर, संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रकारची मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षा अधिकारी यांना कटुनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशात जाण्यासाठी श्रीलंका हवाई दलाचे विमान उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती श्रीलंकेच्या हवाई दलाने दिली आहे. मात्र, त्याचा राजीनामा अद्याप प्राप्त झालेला नाही, असे श्रीलंकन संसदेच्या सभापतींनी सांगितले. दिवसभरात तो आपल्याकडे येईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

तथापि, गोतबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून पळून जाण्यासाठी भारताने मदत केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने त्याचा इन्कार केला आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार असून भारत कायमच श्रीलंकन नागरिकांच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे भारताने स्पष्ट केले.