(SS UBT Vs BJP) मुंबई : सैन्य माघारीचा करार चीनला करायला भाग पाडून ‘जितं मया’चा आव मोदी सरकारने आणला होता. चिनी राष्ट्राध्यक्ष मोदी यांना घाबरले आणि त्यांनी हा करार केला अशा गमजा मोदीभक्त करीत होते. मात्र चीन हा चीनच आहे. त्याचे शेपूट वाकडेच राहणार, हे स्पष्ट असल्याचे सांगत ठाकरे गटाने मोदी सरकारवर शरसंधान केले आहे. (Thackeray group worried about Chinese intrusion)
चीनच्या राष्ट्राध्यक्षांना तुम्ही साबरमती नदीच्या किनारी झुल्यावर बसवून फाफडा-जिलेबी खाऊ घातली तरी भूतानपासून अरुणाचलपर्यंत भारतीय भूभाग गिळंकृत करण्याची त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा जराही कमी होणार नाही. चीन आपल्याशी सैन्य माघारीच्या कराराचे नाटक करील आणि दुसरीकडे सीमांवरील भारतविरोधी उचापती सुरूच ठेवील, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – India – China : आमच्या राज्यकर्त्यांचे कागदी बाण चिनी ड्रॅगन फेकून देतो, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा
मागील चार वर्षांपासून डोकलाम भागात दोन्ही देशांदरम्यान सातत्याने तणावपूर्ण वातावरण राहिले आहे. गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या भयंकर चकमकीने तर हा तणाव तुटतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र अलीकडील काही महिन्यांत चर्चेच्या सुमारे दोन डझन फेऱ्या आणि इतर बैठका यामुळे सीमा भागांतील हे वातावरण निवळल्याचा दावा मोदी सरकार मोठा गाजावाजा करीत होते, असा टोला ठाकरे गटाने लगवाल आहे.
ऑक्टोबर महिन्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेऊन एप्रिल 2020ची स्थिती पूर्ववत केली होती. या घटनेचाही मोदी सरकारने मोठा डिंडोरा पिटला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांची भेट घेऊन पूर्व लडाखमधील परिस्थिती ‘सकारात्मक’ झाल्याचे सांगितले होते, याकडेही ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.
आताही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या ‘गळाभेटी’चे तुणतुणे मोदी सरकार वाजवीत असताना आपल्या सीमांवर चीनने 22 गावे वसविल्याचे सॅटेलाइट फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. हा केवळ योगायोग नाही तर चिनी ड्रॅगनचा खरा चेहरा आहे. गळाभेट घेतानाच गळा कापण्याचा आणि विश्वासघात करायचा या चीनच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही, याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे. (SS UBT Vs BJP: Thackeray group worried about Chinese intrusion)
हेही वाचा – BJP vs Congress : भाजप म्हणजे नाट्यशाळा; संसदेत झालेल्या राड्यावर काय म्हणाले राऊत?