दिल्ली महापालिकेत स्थायी समिती निवडणूक बनली रणसंग्राम, कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीदरम्यान सभागृहात गोंधळ सुरूच आहे. काल, गुरुवारी रात्रीपासून सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच नगरसेवक गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. काल, गुरुवारी हाणामारी झाली आणि बाटल्यांची फेकाफेक करण्यात आली. सभागृहात मधूनमधून कागदी गोळे उडवले जात होते. महिला नगरसेवकही एकमेकांशी वादावादी करत होत्या. हा गोंधळ आज, गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सभागृहाची बैठक तहकूब करण्यात आली.

माजी महापौर व उपमहापौर निवडणूक पार पडल्यानंतर बुधवारी झालेल्या गदारोळामुळे रात्री उशिरापर्यंत स्थायी समितीची निवडणूक होऊ शकली नाही. स्थायी समिती निवडणुकीदरम्यान आम आदमी पार्टी आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि बाटल्या फेकून मारण्यात आल्या. त्यामुळे ही निवडणूक आज, गुरुवारी सकाळपर्यंत होऊ शकली नाही.

भाजपच्या नगरसेवकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. निवडणूक झाल्याशिवाय सत्र संपणार नाही; वाटल्यास सभागृहाचे कामकाज अनेक दिवस चालवले जाईल. स्थायी समितीही आपकडेच राहील, असे आपचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या बैठकीतच निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपचे नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेले, मात्र भाजपचे नगरसेवक महापौरांची वाट पाहत बसले.

महापौर, उपमहापौर निवडणूक शांततेत
महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूक शांततेत पार पडली. मतदानावेळी सदस्यांसोबत मोबाईल नेण्यास बंदी होती. सर्व सदस्यांनीही त्याचे पालन केले. महापौरपदी आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला. तर, उपमहापौरपदी आपचे आले मोहम्मद इक्बाल यांची निवड झाली. आले मोहम्मद इक्बाल यांना 147 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार कमल बागडी यांना 116 मते मिळाली.

गोंधळाचे कारण बनला मोबाइल
महापौरांनी सभागृहाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब केले आणि पुन्हा कामकाज सुरू होताच स्थायी समितीच्या निवडणुकीला सुरुवात करू, असे त्यांनी सांगितले, सुमारे दोन तासांनंतर महापौर शैली ओबेरॉय सभागृहात परतल्या. यावेळी नगरसेवकांनी सभागृहात हनुमान चालिसाचे पठण केले आणि देशभक्तीपर गाणी सुद्धा गायली. सभागृहात जय श्री राम, जय बजरंग बलीचा जयघोष करण्यात आला. दोन तासांपासून बेपत्ता असलेल्या महापौर कधी परतणार आहेत, असा सवाल भाजपाच्या नगरसेवक शिखा राय यांनी महापालिकेचे सचिव भगवान सिंह यांना केला. त्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी महापौर परतल्या आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.

महापौरांनी स्थायी समितीच्या मतदानासाठी मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव केला. याला भाजपा नगरसेवकांनी विरोध केला. काही वेळानंतर मतदान केल्यानंतर सदस्य बॅलेट पेपरचे फोटो काढत असल्याचा भाजपा नगरसेवकांनी निषेध केला. ही मतदानाची घटनाबाह्य पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून सभागृहात गोंधळ वाढला, तोपर्यंत 43 सदस्यांनी मतदान केले होते. सुमारे दीड तास सभागृहात गोंधळ सुरू होता. रात्री आठ वाजेपर्यंत स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होऊ शकली नाही.

यादरम्यान, महानगरपालिकेचे सचिव भगवान सिंग यांनी महापौर शेली ओबेरॉय यांना, मतदान करताना मोबाइलसोबत घेऊन जाण्याचे मनाई असल्याची कागदपत्र दाखवली. यानंतर महापौरांनी मोबाइलसोबत न घेता मतदान करण्याचे आदेश दिले. मात्र त्यावर भाजपा नगरसेवकांनी, मोबाइलसोबत नेऊन यापूर्वी केलेले मतदान अनधिकृत ठरवून, ते रद्द करावे, अशी मागणी केली. त्यामुळे हे मतदान पुन्हा घेतले जाणार की नाही, याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता.